Tuesday 12 October 2010

दिनविशेष ऑक्टोबर - दुसरी सुरत लुट आणि मराठा - मुघल लढाई ...

१६ वर्षात जे कमावले ते जवळ-जवळ सर्व पुरंदरच्या तहात राजांनी गमावले होते. लढण्याची किमान ताकद शिल्लक राहिली होती. सोबत होती ती फक्त प्रचंड आत्मविश्वासाची, निर्धाराची, जिजाउंच्या आशीर्वादाची आणि स्वराज्यस्वप्न साकार करायचेच ह्या ध्येयाने झपाटलेल्या सोबतींची. नोव्हेंबर १६६६ मध्ये आग्र्याहून स्वतःची सुटका करून परत आल्यावर शिवरायांनी औरंगजेबाच्या दख्खन सुभेदाराला म्हणजे शहजादा मुअझ्झम याला 'आपण झालेला तह मोडणार नाही' असे पत्र लिहून स्पष्ट कळवले होते. ह्या मागचे राजकारण साधे सरळ होते. लढण्याची ताकद पुन्हा एकदा निर्माण करायला काही अवधी जावा लागणारच होता. १६६७-१६६९ ह्या २ वर्षात मराठ्यांनी इंग्रजांकडून नवीन शस्त्रे विकत घेतली. फौज अधिक वाढवली. विजापूर आणि पोर्तुगिझ यांना आपला धाक दाखवायला मराठा फौज पुन्हा सज्ज झाली होती. पोर्तुगिझांना आणि त्यांच्या संरक्षणात पुंडगिरी करणारया ३ देसायांना धाक बसावा म्हणून राजांनी 'बारदेश मोहीम' आखली, यशस्वी केली आणि पोर्तुगिझांना मराठ्यांचे वर्चस्व मान्य करून तह करणे भाग पडले.

आता सिद्दीने मराठ्यान विरोधात कुरापती सुरु केल्या. उघडपणे इंग्रज आणि पोर्तुगिझ लपून त्याला मदत करत होते. खुद्द मुघल सिद्दीला मराठ्यांविरोधात उद्युक्त करीत होते. तिकडे उत्तरेत सप्टेंबर १६६९ मध्ये औरंगजेबाने बनारसमध्ये मंदिरे तोडण्याचा सपाटा चालवला. शिवरायांना ह्या गोष्टीचा नक्कीच प्रचंड राग आलेला असणार. डिसेंबर महिन्यात औरंगाबाद येथे असणारे प्रतापराव आणि आनंदराव मराठा फौज घेऊन राजगडी परत आले. मराठे आणि मुघल यांच्या मधला तह मोडला होता. पुन्हा मराठे - मुघल तह झाला तो ३७ वर्षे लढल्यावर आणि औरंगजेबाच्या मृत्युनंतर...

फेब्रुवारी १६७० मध्ये मराठे विस्मयजनकरित्या मुघलांवर तुटून पडले. ४ फेब्रुवारी १६७० रोजी 'सुभेदार तानाजी मालुसरे' यांनी कोंढाणा जिंकून ह्याची सुरवात करून दिली. गड-किल्ल्यांवर, पायथ्याला, मैदानात, जंगलात, डोंगरात जिकडे दिसेल तिकडे मुघली फौजेवर मराठा फौज तुटून पडली. लोहगड, रोहिडा, माहुली आणि पुरंदरच्या तहात दिलेले किल्ले एकामागून एक पुन्हा एकदा मराठ्यांनी जिंकून घेतले. शिवाय मुघलांचे काही किल्ले आणि जहागीर लुटायचे काम सुरु केले. फेब्रुवारी ते जुलै महिन्यापर्यंत मुघल फौजेच्या हालाला पारावर राहिला नव्हता. पावसाळ्याच्या शेवटाला अजून एक धक्कादायक बातमी दिल्लीला पोचली. 'शिवाजीने पुन्हा सुरत लुटली.'

१०,००० पायदळ आणि १०,०००  घोडदळ, पंत प्रधान मोरोपंत पिंगळे, सेनापती प्रतापराव, उपसेनापती आनंदराव ह्या सर्वांना सोबत घेऊन ३ ऑक्टोबर रोजी खुद्द शिवराय सुरत येथे जाऊन पोचले. सुरतेच्या वेशीवरून त्यांनी सुरतेच्या मुघली सुभेदाराला पत्र पाठवले. 'बादशहामुळेच मला माझ्या जनतेचे आणि देशाचे रक्षण करण्यासाठी फौज उभी करावी लागत आहे. तेंव्हा त्या फौजेचा खर्च सुद्धा तुमच्याच प्रांतातून द्यायला हवा. मी तिसऱ्यांदा आणि शेवटचे सुरतेच्या उत्पन्नाचा चौथा भाग मागत आहे.'

(संभाजीराजांच्या ठाणे-रामनगर मोहिमेदरम्यान सुद्धा मराठ्यांनी सुरतेकडून 'दुसऱ्यांदा' चौथवसूल केली होती.)


ह्या पत्रामध्ये शिवाजीराजांचा हेतू आणि उद्देश स्पष्ट दिसून येतो.

'I demand for the 3rd time, which I declare to be the last, chauth part of revenue under your government. As your emperor has forced me to keep an army for the defense of my people & country, that army must be paid by his subjects.'

ह्या नंतर सुद्धा सुभेदाराकडून काहीच उत्तर मिळाले नसल्याने मराठ्यांनी ३ ऑक्टोबर ते ५ ऑक्टोबर असे तब्बल ३ दिवस निवांतपणे सुरत लुटली. इतक्या प्रचंड वेगाने २०००० मराठा फौज सुरतेवर पुन्हा हल्ला करेल असे कोणाला स्वप्नात देखील वाटते नव्हते. पण जे शत्रूला अपेक्षित नसते नेमके तेच करण्यात शिवराय तत्पर होते. मराठ्यांनी आपला डाव साधला होता. जिथल्या वेगाने ते सुरतेच्या दिशेने गेले तितक्याच वेगाने लुट घेऊन ते आता परतीच्या मार्गावर निघाले होते. दख्खनेचा मुघल सेनापती दाऊदखान त्यांना अडवायला रवाना झाला होता. मराठा फौज बागलाणमध्ये 'वणी-कांचन' येथे पोचल्याची बातमी त्याला मिळाली होती. दख्खन सुभेदार मुअझ्झमने बाकीखानाला अधिक कुमक आणि रसद घेऊन दाऊदखानाकडे पाठवले. तर बाकीखानाची वाट बघणाऱ्या दाऊदखानाने मराठ्यांचा माग काढायला इखलास खानमियाना याला पुढे धाडले होते.

मराठ्यांची १५००० फौज आघाडीला दौडत असताना इखलास खानमियाना याने सेनापती दाऊदखान आणि बाकीखानाची वाट न बघता मराठ्यांवर हल्ला चढवला. अर्थात तो त्याचा मोठाच मूर्खपणा ठरला. तो स्वतः त्याच्या फौजेसकट जबर जखमी झाला. मराठ्यांनी मुघल फौजेची सरसकट कत्तल चालवली. काही काळाने दाऊदखान आणि बाकीखान तेथे येऊन पोचले. मुघलांची बहुदा लढाईची कसलीच तयारी झालेली दिसत नव्हती. मुघल फौजेने मराठा फौजेकडून सपाटून मार खाल्ला. मुघलांसोबत असणाऱ्या 'बुंदेले' सैन्याने मराठ्यांना कसे बसे रोखून धरले होते. मराठ्यांचे लक्ष देखील लढाई करणे नव्हते. सोबत असलेला 'करोडो'चा खजिना सुखरूप मार्गी लावणे हे त्यांचे प्रथम उदिष्ट्य होते. संपूर्ण दिवसात मराठ्यांनी 'बेरीरगिरी' म्हणजे 'शत्रुला चोहूबाजूने घेरून केली जाणारी फिरती लढाई' या तंत्राने मुघलांना हैराण करून सोडले. १६ ऑक्टोबरच्या संध्याकाळी मराठा फौजेने पुन्हा एकदा मुघलांवर जबर हल्ला चढवत आपली पुढची वाट मोकळी करून घेतली आणि ते सुरतेच्या लुटीसकट पुढे सटकले. मराठ्यांची पिछाडीची फौज मुघलांना गुंगारा देत, मध्येच लढत लुटी पासून दूर घेऊन जात होती.

मराठे - मुघल तह मोडल्यानंतर पहिल्यांदाच सामोरा-समोरच्या लढाईत मराठ्यांनी मुघली फौजेला पराभूत केले होते. खुद्द शिवराय जातीने ह्या लढाईमध्ये सामील होते. स्वतःची भूमी गानिमापासून मुक्त करण्यासाठी ते आसुसलेले होते. सुरत लुट सुरक्षितरित्या राजगडाच्या वाटेवर नेण्यात मराठ्यांना यश आलेच. पण इतक्यावर ते थांबले नाहीत. शिवरायांनी पंतप्रधान मोरोपंत पिंगळे यांना त्रिंबक, औंढा, पट्टा, रवळ्या-जावळ्या हा नाशिक आसपासचा संपूर्ण भाग काबीज करण्याच्या कामगिरीवर पाठवले आणि शिवराय खुद्द करंजारंजा, बेरर ह्या खानदेश भागात शिरले. मुघली भागात त्यांनी प्रचंड लुट चालवली.


थोडक्यात शिवरायांनी मुघलांना पूर्णपणे जमीनदोस्त करण्याच्या दिशेने एक मजबूत पाउल उचलले होते. आता ते मागे हटणार नव्हते.

स्वसंरक्षणाचा सर्वोत्तम पर्याय होता... शत्रूच्या प्रदेशात आक्रमण...