Friday 14 January 2011

मराठे गिलचे साचे कलीत लढले पानिपती...

बुधवार, १४ जानेवारी १७६१. पौष शु. अष्टमी. पानिपतचा भयंकर, प्राणघातकी संग्राम याच दिवशी झाला होता.

गोविंद्रग्रजांच्या शब्दात सांगायचे तर,

"कौरव पांडव संगर तांडव द्वापरकाली होय अती, तसे मराठे गिलचे साचे कलीत लढले पानिपती !!"

खरेतर अधिक काही लिहावे असा मानस होता पण इतरांनी इतकी
विस्तृत लिहिले आहे त्यावर अजून तेच कशाला असाही एक विचार आला. गेल्या काही दिवसात पानिपत विषयावर वाचलेली काही चांगली माहिती -
 

१. लोकसत्ता मधील मेजर जनरल (निवृत्त) शशिकान्त पित्रे यांचा उत्कृष्ट लेख - ह्यात इतिहासच नाही तर लढाईचे युद्ध शास्त्रीयरित्या विश्लेषण केलेले आहे.
२. सुहासची पोस्ट.
३. देवेंद्रची पोस्ट.

२००३ साली मी जेंव्हा विश्वास पाटीलांचे पुस्तक वाचायला घेतले तेंव्हा मला पानिपत ह्या विषयावर विस्तृत माहिती अजिबात नव्हती. दररोज सकाळी ठाणे ते दादर आणि संध्याकाळी दादर ते ठाणे असा ट्रेन प्रवास करताना मी पानिपत वाचायचो. आजूबाजूचा कोलाहल, गर्दीगोंगाट अजिबात कानी यायचा नाही. अगदी भारावल्यागत वाचत सुटायचो. अनेक महिने एकच सीटवरून प्रवास केल्याने आजूबाजूचे ओळखीचे झालेले सुद्धा विचारायचे. कुठे पोचले मराठे? आता पुढे काय होतंय? इतकी उत्सुकता.. जणू काही आत्ताच ते तिथे घडतंय!!! मग आदल्या दिवशी वाचलेले थोडक्यात मी सर्वांना सांगायचो. मग इतिहासावर चर्चा सुरू व्हायच्या.
मला लोकांना इतिहास सांगायची सवय बहुदा तिथूनच सुरू झाली असावी. अक्षरशः काही दिवसात मी ते पुस्तक मी वाचून काढले. नंतर लक्ष्यात आले की इतिहासाच्या नोंदी घ्यायला हव्यात. पण ते ट्रेनमध्ये शक्य नव्हते. जेंव्हा नोकरी सोडली तेंव्हा वर्षभर घरी बसून होतो. पुन्हा एकदा पानिपत सविस्तर वाचून काढले. एक आख्खी डायरी भरून नोंदी काढल्या. अमुल्य  माहिती नीट जपून ठेवली.
आता मला खुद्द पानिपतला भेट द्यायची आहे. माझे एक स्नेही, आज निनाद बेडेकर यांच्यासोबत तिथे गलेले आहेत. तिथला वृतांत हाती आला की देईनच... :)


 
पानिपत येथील पराभव हा मराठी राज्याला कलंक नसून अभिमानास्पद असाच आहे. कारण, या नंतर वायव्य सीमा कायमची सुरक्षित झाली. अफगाणी आक्रमक परत दिल्ली पाहू शकले नाहीत... करेंगे या मरेंगे... ह्या घोषणेपेक्षा.. 'बचेंगे तो और भी लढेंगे' ही दत्ताजी शिंदे यांची बोली खुद्द महाराजांकडून आली होती. हा स्वराज्याचा मूलमंत्र होता...

एक मराठी म्हणून मला प्रचंड अभिमान आहे की आम्ही देशासाठी एक खूप मोठे बलिदान दिलेले आहे. त्याचे स्मरण आम्हास कायम रहो हीच इच्छा... :)


जाता जाता तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा... त्या वीरांची आठवण ठेवतच स
साजरा करा..