Tuesday, 16 March 2010

दिनविशेष - मार्च महीना ... भाग २

१४ मार्च १६४९ - शिवरायांनी शहाजीराजांच्या सुटकेसाठी शाहजहानचा मुलगा आणि मुघलांचा दख्खनेचा सुभेदार शहजादा मुराद यास पत्र लिहले. शिवाजी राजांच्या दख्खनेमधल्या कारवायांच्या बदल्यात अफझलखानाने शहाजीराजांना २५ - २८ जुलै १६४८ च्या दरम्यान जिंजी येथे अटक केली होती. ह्या पत्राने विजापुरच्या आदिलशहा वर दबाव पडून २ महिन्यानंतर शहाजीराजांची सुटका झाली. मात्र त्या बदल्यात शिवरायांना सिंहगड विजापुरला परत द्यावा लागला.

१५ मार्च १६८० - शिवाजी महाराजांचे द्वितीय पुत्र 'राजाराम' यांचे प्रतापराव गुजर यांच्या मुलीशी म्हणजेच 'ताराऊ उर्फ़ ताराबाई' हिच्याशी लग्न. त्यांचे नाव लग्नानंतर बदलून 'सिताबाई' असे ठेवले.
 
१६ मार्च १६७३ - १२ वर्षानंतर पन्हाळा स्वराज्यात पुन्हा दाखल झाल्यानंतर शिवाजी महाराज पन्हाळगड येथे पोचले. अवघ्या ६० मावळ्यांना घेऊन कोंडाजी फर्जदने ६ मार्च १६७३ रोजी किल्ला जिंकला होता.
 
१९ मार्च १६७४ - राजाभिषेकापूर्वी शिवरायांच्या सर्वात धाकट्या पत्नी काशीबाई वारल्या.
 
२१ मार्च १६८० - शिवरायांनी कुलाबा उर्फ़ अलिबाग किल्ल्याची बांधणी सुरु केली. ह्यानंतर अवघ्या १४ दिवसात ३ एप्रिल १६८० रोजी राजांचे महानिर्वाण झाले आहे.
 
२२ मार्च १७५५ - इंग्रज - पेशवे यांचा तह. यान्वये इंग्रज मराठा नौदलावर म्हणजेच तूळाजी आंग्रेवर (सुवर्णदुर्गावर) स्वारी करण्यासाठी मुंबईहून निघाले. तूळाजी आंग्रे जुमानीत नाही म्हणून स्वतः पेशवे आपल्याच आरमाराच्या जीवावर उठले होते.
 
२४ मार्च १६७७ - दक्षिण दिग्विजयाप्रसंगी शिवरायांचा श्रीशैल्य मल्लिकार्जुन येथे मुक्काम. भाग्यनगर (सध्याचे हैदराबाद) पासून काही अंतरावर असलेल्या या पवित्रस्थानी राजांचे काही काळ वास्तव्य होते. येथे असलेल्या गोपुरास 'श्री शिवाजी गोपुर' असे नाव असून तेथे शिवरायांचे हातात तलवार घेतलेले दगडामधले कोरीव शिल्प पहावयास मिळते.
 
२७ मार्च १६६७ - शिवरायांना सोडून आधी आदिलशाही आणि मग मुघलांना शामिल झालेल्या नेतोजी पालकरांचे औरंगजेबकडून धर्मांतर. नेतोजी पालकरांचा मुहंमद कुली खान बनवला गेला.
 
३० मार्च १६४५ - शके १५५७ म्हणजेच इ. स. १६४५ च्या एप्रिल महिन्यात वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी राजांनी स्वराज्य शपथ वाहिली. रोहिड खोरे आणि वेळवंड खोरे येथील देशपांडे - कुलकर्णी दादाजी नरसप्रभु हे राजांसोबत होते असे काही वतनदारांकडून कळल्यावर आदिलशहाच्या शिरवळ येथल्या सुभेदाराने त्यांना ३० मार्च १६४५ रोजी धमकीवजा पत्र पाठवले. या पत्रामुळे दादाजी चिंतेत असल्याचे कळताच राजांनी त्यांना खालील पत्र पाठवले. 'हे राज्य व्हावे हे श्रीचे मनांत फार आहे' या आशयाचे पत्र पाठवले. आपण सुरु केलेले कार्य हे ईश्वरी इच्छेनूसार आहे, ही धारणा त्यांनी ह्या पत्रामधून व्यक्त करून त्यांचे मनोबल वाढवले आहे. पूर्ण पत्र येथे वाचा.

३१ मार्च १६६५ - इतिहास प्रसिद्ध पुरंदरचा वेढा सुरु. मिर्झा जयसिंह व दिलेरखान पठाण पुरंदरच्या पायथ्याशी २९ मार्च येऊन दाखल झाले होते.

No comments:

Post a Comment