Monday 15 March 2010

दिनविशेष - मार्च महीना ... भाग १

२ मार्च १८१८ - दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोड़फोड़ केली. त्यात २ मार्च १८१८ रोजी इंग्रजांनी सिंहग़डावर तोफा डागायला सुरवात केली.

३ मार्च १६६५ - मोगल सरदार मिर्झाराजा जयसिंह लाखभर सैन्य घेउन शिवरायांशी लढण्यासाठी पुण्यात येउन दाखल झाला. 3 वर्षात शिवाजी महाराजांनी मोगलांना सळो की पळो करून सोडले होते. शाहिस्तेखानाची बोटे कापली. सुरत बेसुरत केली आणि त्यावर मोगल सरदारांना पत्र लिहून आपले उद्दिष्ट स्पष्ट कळवले होते. आता औरंगजेबाला आपला सर्वात जिगरबाज सरदार दखखनेमध्ये पाठवणे भाग होते.
 
४ मार्च १८१८ - दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोड़फोड़ केली. त्यात ४ मार्चला विसापूरचा किल्ला कर्नल प्रौथरने तोफा डागून उद्धवस्त केला. आता किल्ल्याची काही मीटरभर तटबंदी योग्य स्थितीत उरली आहे.
 
५ मार्च १६६६ - औरंगजेबाच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त त्यास भेटण्यासाठी शिवाजी राजे राजग़डाहून आग्र्याला जायला निघाले. त्यांच्या सोबत होते ९ वर्षाचे शंभूराजे, सर्जेराव जेधे, हीरोजी फर्जद, निराजीपंत, मदारी मेहतर.
 
६ मार्च १६७३ - १२ वर्षानंतर पन्हाळा स्वराज्यात पुन्हा दाखल. अवघ्या ६० मावळ्यांना घेऊन कोंडाजी फर्जदने किल्ला जिंकला. अन्नाजी दत्तो, गणोजी कावले आणि मोत्याजी खालेकर हे सोबतचे सरदार.


शिवरायांनी पन्हाळ्यावरुन सुटका करून घेतल्यानंतर हा किल्ला आदिलशाहीला द्यावा लागला होता. तो राजाभिषेकापूर्वी स्वराज्यात यावा असे शिवरायांना वाटत होते. त्यासाठी त्यांनी कोंडाजीला रायग़डी बोलावून मोहिमेआधीच सोन्याचे कड़े बक्षिष म्हणून दिले आणि 'यशस्वी होउन या' असे सांगूनच मोहिमेवर पाठवले.
 
७ मार्च १६४७ - दादाजी कोंडदेव यांचे पुणे येथे वृद्धापकालाने निधन.
 
८ मार्च १६७० - पुरंदरच्या तहात गमावलेला पुरंदर-वज्रगड निळोपंत मुजुमदारांनी छापा घालून मोगलांकडून काबीज केला. ज्या पुरंदरासाठी दिलेरखान व मिर्झाराजांनी अतोनात प्रयत्न केले होते, तोच पुरंदर निळोपंतांनी अवघ्या २४ तासात काबीच केला.
 
९ मार्च १६५० - तूकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले. फाल्गुन वद्य द्वितीया, शके १५७१, प्रथम प्रहर.
 
१० मार्च १६७३ - रायगडाहून पन्हाळगडाकडे जाताना वाटेत शिवाजी महाराजांचा प्रतापगडावर मुक्काम. प्रतापगडास भवानी देवीची शोडषोपचारे पूजा.


१० मार्च १६७७ - ५ फेब्रुवारी १६७७ ते १० मार्च १६७७ या कालावधीतील भागानगर (हैद्राबाद) येथील मुक्काम आटोपून शिवरायांचे दक्षिणदिग्वीजयास्तव दक्षिणेकडे प्रस्थान.

१० मार्च १७०४ - औरंगजेबाने स्वतःच्या ८९ व्या वाढदिवसाला तोरणा उर्फ़ प्रचंडगड़ जिंकला.
 
११ मार्च १८१८ - दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोड़फोड़ केली. त्यात कर्नल प्रौथरने ११ मार्चला कोरीगड़वर हल्ला केला. ४ दिवसांनी दारूकोठार तोफेत नष्ट झाल्याने अखेर मराठ्यांनी शरणागती पत्करली.

No comments:

Post a Comment