Thursday 18 February 2010

१८ फेब्रुवारी - ब्लॉग समाप्ती ... !

दोस्तहो... आज माझ्या अनेक ब्लोग्सचा पहिला वाढदिवस. गेला वर्षभर विविध ब्लोग्समधून 'मराठ्यांच्या इतिहास' आणि 'सहयभ्रमंती'वर लिखाण सुरू होतेच. त्यातील 'मराठा इतिहासाची दैनंदिनी' या ब्लॉगची आज ह्या ब्लॉगपोस्टने  समाप्ती होत आहे.

गेल्या वर्षी १९ फेब. रोजी शिवजयंतीचे औचित्य साधून मी मध्ययुगीन इतिहासावर काही दिनविशेष आपल्यासमोर मांडले. आज १ वर्षानंतर पुन्हा एकदा शिवरायांना वंदन करून ह्या ब्लॉगची समाप्ती करत आहे. धन्यवाद ... !

.
.
नोंद : जसे जसे नवीन दिनविशेष वाचनात येतील तसे तारखेप्रमाणे ते येथे नोंदवले जातील ह्याची नोंद घेणे. अन्यथा महिन्यातून एकदाच आधीचे सर्व दिनविशेष पून्हा प्रकाशित केले जातील.

Wednesday 17 February 2010

१७ फेब्रुवारी

१७ फेब्रुवारी - वासुदेव बळवंत फडके पुण्यतिथी.

" ज्या भूमीचे पोटी आपण जन्म घेतला, तिच्याच पोटी ही सर्व लेकरे झाली. त्यांनी अन्नान्न करीत उपाशी मरावे, आणि आपण कुत्र्याप्रमाणे पोट भरीत रहावे, हे मला पाहवले नाही आणि म्हणून ब्रिटिश सरकारविरूद्ध मी बंड पुकारले !"

"अहो माझ्या हिंदुस्थानवासी बांधवहो, तुमच्या कल्याणासाठी मी माझे प्राण पणास लावीत आहे. असा प्रयत्न करण्यातही मी काय पुरुषार्थ केला ? दधिची ऋषींनी आपल्या अस्थीही देवांच्या कल्याणासाठी नाही का काढून दिल्या ? तसेच माझे प्राण घेऊन तरी इश्वराने तुम्हांला सुखी करावे, अशी माझी त्याला प्रार्थना आहे !"

"मी मरून जाईन. पण या दुष्ट, प्रजाभक्षक, चांडाळ इंग्रजांना मेल्यानंतरही मी शांतता लाभू देणार नाही."

                                                                                                                    - वासुदेव बळवंत फडके ...

१६ फेब्रुवारी १७०४

१६ फेब्रुवारी १७०४ - औरंगजेबने राजगड़ जिंकून त्याचे नाव नबिशाहगड़ ठेवले. येथून तो पुढे किल्ले तोरण्याकडे निघाला.

१५ फेब्रुवारी १७४५

१५ फेब्रुवारी १७४५ - पेशवे माधवराव यांचा जन्मदिवस.

१३ फेब्रुवारी १६३०

१३ फेब्रुवारी १६३० - मुघल बादशाह शाहजहाँ आदिलशाही आणि निझामशाही संपवण्याच्या उद्देशाने खानदेश येथील बुरहाणपुर येथे पोचला.

११ फेब्रुवारी १८१८

११ फेब्रुवारी १८१८ - दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांवर हल्ला चढवला. त्यात ११ फेब.ला इंग्रजांनी किल्ले अजिंक्यतारा वर ताबा मिळवला.

११ फेब्रुवारी १६७१

११ फेब्रुवारी १६७१ - होळीच्या सणाचा फायदा उठवून सिद्दी कासिम याने दंडा राजपूरी येथील सामराजगड़ जिंकला.

११ फेब्रुवारी १६६०

११ फेब्रुवारी १६६० - औरंगजेबाने मुख़्तारखान याला दख्खनेची जबाबदारी सोपवून औरंगाबाद येथे पाठवले.

Tuesday 9 February 2010

८ फेब्रुवारी १६६५

८ फेब्रुवारी १६६५ - स्वतःचे आरमार उभारल्यानंतर शिवरायांनी पहिली आरमारस्वारी कर्नाटकमधील 'बिदनूर'वर काढली. या मोहिमेकरता मालवण बंदरातून ५० गलबते, ३ मोठ्या तारवा आणि ४००० सैनिकांची फौज बिदनूरकडे निघाली. राजांनी स्वतः ह्या सागरी स्वारीचे नेतृत्व केले.

१६६४ मध्ये सिंधुदुर्गाची पायाभरणी, सुवर्णदुर्ग आणि विजयदुर्ग यांची मजबूती वाढवल्यावर सिद्दी आणि पोर्तुगीझ यांच्यावर मराठ्यांची पकड़ बसू लागली होती. आपले सागरी वर्चस्व सिद्ध करण्याकरता अश्या मोहिमेची आवशक्यता मराठ्यांना होती. या मोहिमेत मराठ्यांनी 'बिदनूर' मधून विजापुरकडे जाणारा २ करोड़ होन इतका खजिना लूटत मोहिम यशस्वी केली.

८ फेब्रुवारी १७१४

८ फेब्रुवारी १७१४ - 'सरखेल कान्होजी आंग्रे' आणि 'छत्रपति शाहू महाराज' यांच्यात वळवंड, लोणावळा येथे तह. १७०७ मध्ये मराठेशाही मध्ये फुट (कोल्हापुर आणि सातारा गादी) पडल्यावर कान्होजी आंग्रे कोणाचीही बाजु न घेता स्वतंत्रपणे कारभार सुरु केला होता. पुढे त्यांचे बालमित्र असलेले 'पेशवे बाळाजी विश्वनाथ' यांनी त्यांचे मन वळवून सातारा गादी बरोबर तह करवला.

Friday 5 February 2010

५ फेब्रुवारी १७६६

५ फेब्रुवारी १७६६ - पेशवे माधवराव आणि हैदराबादच्या निजमाची कुरूमखेड येथे भेट.

Thursday 4 February 2010

५ फेब्रुवारी १६७० - 'सुभेदार तानाजी मालुसरे'

५ फेब्रुवारी १६७० - 'सुभेदार तानाजी मालुसरे' यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन सिंहगड स्वराज्यात परत आणला.






गडावर किल्लेदार उदयभानु राठोड आणि त्याच्या हाताखाली सुमारे १५०० सैनिक होते. ४ फेब्रुवारीच्या (माघ वद्य नवमी) रात्री तानाजी मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली राजगडावरुन निघालेले मराठा सैन्य गुंजवणी नदी पार करत सिंहगडाच्या पायथ्याला येउन पोचले. अंधारातच त्यांनी कडा चढून सर केला आणि अखेरच्या श्वासापर्यंत लढाई करून त्यांनी हा किल्ला जिंकायचे प्रयत्न केले. हातघाईच्या लढाईमध्ये जबर जखमी होउन ते मृत्यू पावले. मात्र त्यांच्यामागुन 'सूर्याजी मालुसरे' आणि 'शेलारमामा' यांनी नेतृत्व करून हा किल्ला काबीज केला. गडावरील गवताच्या गंज्या पेटवून किल्ला जिंकला गेल्याचा इशारा राजांना राजगडावरती दिला गेला होता. त्याक्षणाची राजे राजगडावरुन आतूरतेने वाट बघत होते. तो इशारा बघताच राजे कदाचित मनातल्या मनात म्हणाले सुद्धा असतील,'तानाजीने आधी कोंढाण्याचे लग्न लावलेच.' पण तेंव्हा राजांना माहीत कुठे होते की कोंढाण्याचे लग्न लावता-लावता त्यांचा बालसखा तानाजी आपला मुलगा रायबाचे लग्न न लावताच दूर निघून गेला होता... दुसऱ्या दिवशी राजे सिंहगडावर पोचले तेंव्हा त्यांना ही बातमी मिळाली. अत्यंत दुख्खी अश्या राजांनी आपल्या तानाजीचे शव त्यांच्या 'उमरठ' (पोलादपुरजवळ) या गावी पाठवले. ज्यामार्गाने तानाजी मालुसरे यांची प्रेतयात्रा गेली तो आता 'मढेघाट' या नावाने ओळखला जातो. तानाजी गेले त्या जागेवर त्यांचा 'विरगळ' स्थापन केला गेला आहे. शिवाय एक सुंदर स्मारक सुद्धा उभे केले गेले आहे. स्मारकामध्ये असलेला त्यांचा भरदार मिशांचा अर्धाकृती पुतळ्यासमोर उभे राहिल्यावर ऊर अभिमानाने भरून येतो.


नकळत हात छातीकडे जात आपण म्हणतो ... 'मुजरा सुभेदार' ...!!!

Wednesday 3 February 2010

३ फेब्रुवारी १८३२

३ फेब्रुवारी १८३२ - रामोशी जातीमधील 'उमाजी नाईक खोमणे' यांना पुण्यातील मामलेदार कचेरीच्या आवारात इंग्रजांनी फासावर लटकावले.

१८१८ नंतर संपूर्णपणे इंग्रजांचे राज्य प्रस्थापित झाल्यावर उमाजी नाईक यांनी आपल्या साथीदारांसोबत पुन्हा एकदा लढा सुरू केला. मात्र ते १८२६ साली पकडले गेले. त्यांच्यावर खटला चालवून त्यांना इंग्रजानी फासावर लटकावले. उमाजी नाईक हे खऱ्याअर्थाने स्वातंत्र्ययुद्धाचे पहिले हुतात्मे आहेत ... !!!

Tuesday 2 February 2010

२ फेब्रुवारी १६८२

२ फेब्रुवारी १६८२ - छत्रपति शिवरायांच्या मृत्यूनंतर दख्खन स्वारीवर आलेल्या औरंगजेबाची पहिली चढाई. नाशिक जवळील 'रामशेज' किल्ल्यावर जोरदार हल्ला. मात्र मराठा किल्लेदार 'रंभाजी पवार' यांनी किल्ला १-२ महिने नव्हे तर तब्बल ६ वर्षे नेटाने लढवला. अखेर १६८८ मध्ये हा किल्ला सुद्धा फितुरी करून मुघलांनी जिंकला...

Monday 1 February 2010

१ फेब्रुवारी १६८९ - 'छत्रपति संभाजी महाराज' मुघलांच्या तावडीत ... !

१ फेब्रुवारी १६८९ - मराठा सरनौबत म्हालोजी घोरपडे यांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर सुद्धा 'छत्रपति संभाजी महाराज' संगमेश्वर येथे असताना मुघल सरदार शेखनजीब खानाच्या तावडीत सापडले. या लढाईमध्ये म्हालोजी घोरपडे धारातीर्थी पडले. ९ वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर शंभूराजे मुघलांच्या तावडीत सापडले होते. मराठ्यांच्या छत्रपतिला कैद करून आणले म्हणुन औरंगजेबाने शेखनजीब खानाला 'मुकर्रबखान' हा किताब दिला. अर्थात त्यांना पकडून देण्यात सर्वात मोठा हात होता 'गणोजी शिर्के'या त्यांच्याच म्हेवण्याचा. इंग्रज, पोर्तुगीझ, मुघल अश्या बलाढ्य शत्रूंना पराभूत करणाऱ्या सिंहाच्या छाव्याला अखेर स्वकियांनी धोका दिला.

१ फेब्रुवारी १६८९ हां तो दिवस... ज्यादिवशी शंभूराजे कैद झाले आणि सरनौबत म्हालोजी घोरपडे धारातीर्थी पडले. त्या गोष्टीला आज बरोबर ३२१ वर्षे पूर्ण होत आहेत.

घोरपडे खरंतरं पिढीजात आदिलशाहीचे चाकर. पण छत्रपति शिवरायांनी म्हालोजींना आपल्याकडे वळवले. 'दक्षिण दिग्विजय' मोहिमेवर असताना गोवळकोंडा येथून त्यांनी म्हालोजी घोरपडे यांना लिहिलेले पत्र 'येथे' वाचू शकता... पुढे १६८५ मध्ये छत्रपति संभाजी महाराज यांच्या काळात सैन्याचे सरनौबत झाले. संताजी-धनाजी मधल्या संताजी घोरपड़े यांचे ते वडिल.

अजून एक योगायोग म्हणजे माझा ब्लॉगमित्र सचिन उर्फ़ साळसूद पाचोळा याने २ दिवसांपुर्वीच त्या प्रसंगावर एक अप्रतिम ब्लॉगपोस्ट लिहिला तो ही आवर्जुन वाचाच.

मराठी दोलत डुबवू पाहणाऱ्या त्या भयाण काळरात्री तो म्हातारा आपल्या दोन बांड्या पोरांसह जीवाच्या आकांतानं दौडत होता... पन्हाळ्यावरून.. संगमेश्वराकडे.... घाट-पांदीतून... गचपानातून...., कारण त्यांच्याही पुढे औरंग्याचा मुकर्रबखान सावज टिपायला उरफोडीनं दौडत होता...    .... पूर्ण वाचा ...