Monday 16 August 2010

१७ ऑगस्ट १६६६... आग्र्याहून सुटका... एक थरारक पलायन...


१६६५च्या मार्च महिन्यात शिवाजीराजे मराठा आरमाराची पहिली मोहीम संपवून गोकर्ण महाबळेश्वर येथे पोचले होते. मराठा हेरांनी पक्की बातमी आणली. मिर्झाराजा जयसिंग लाखभर फौज घेऊन स्वराज्यावर चालून येतोय. राजांनी घाईघाईने राजगड गाठला. औरंगाबादहून निघालेल्या शाही फौजा सासवडला पोचल्या होत्या. २९ मार्च रोजी पुरंदरला वेढा पडला. १५ दिवस घमासान लढाई झाली. १४ एप्रिल रोजी पुरंदरचा जोडकिल्ला वज्रगड मुघलांनी काबीज केला. आता अंतिम लढाई सुरु झाली होती. किल्लेदार मुरारबाजी यांनी जीवाची बाजी लावली. मराठा इतिहासामध्ये ते अमर झाले. आजही तुम्ही कधी पुरंदरला गेलात तर मुरारबाजींचा पुतळा बघून त्यांच्या शौर्याची गाथा कळते. किल्लेदाराबरोबर किल्लाही पडला.

तह व्हायच्या आधी शिवाजीराजांनी मिर्झाराजाला एक पत्र पाठवले होते. या पत्रामधून तत्कालीन परिस्थितीचे आणि शिवरायांच्या मन:स्थितीचे यथार्थ चित्रण झाले आहे. हे पूर्ण पत्र वाचावे असेच आहे. पत्रामध्ये राजे म्हणतात,"तुर्काचा जवाब तुर्कितच दिला पाहिजे."
सर्वत्र सुरु असलेल्या परिस्थितीचा अंदाज घेऊन राजांनी मुघलांशी तह करायचे ठरवले. पुरंदरचा तह घडला. १६ वर्षात जे कमावले ते सर्व या तहात राजांनी गमावले. लढण्याची किमान ताकद शिल्लक राहिली होती. सोबत होती ती फक्त प्रचंड आत्मविश्वासाची, निर्धाराची, जिजाउंच्या आशीर्वादाची आणि स्वराज्यस्वप्न साकार करायचेच ह्या ध्येयाने झपाटलेल्या सोबतींची. तहानंतर शिवाजीराजे कुतुबशहा आणि आदिलशहाच्यासाथीने मुघलांविरुद्ध संयुक्त आघाडी उभी करतील अशी भिती मिर्झाराजाला होती म्हणून त्याने बादशहाला कळवले की 'कुठल्याही परिस्थितीत शिवाजीला आपल्याकडे वळवून घ्यायला हवे. त्यासाठी मी शिवाजीला आपल्या दरबारी पाठवत आहे.' मिर्झाराजाने राजांना आग्रा येथे जाण्यास तयार केले आणि त्याप्रमाणे ५ मार्च १६६६ रोजी राजे आग्रा येथे जाण्यास निघाले. स्वतःच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त खुद्द औरंगजेबाने त्यांना पत्र पाठवून आमंत्रित केले होते. 'मनात कुठलीही चिंता किंवा शंका न ठेवता मला भेटायला या. आपला येथे सत्कार केला जाईल आणि तुम्हाला पुन्हा दख्खनेत जाण्याची मुभा असेल.' मजल-दरमजल करत शिवाजीराजे १२ मे रोजी तेथे पोचले.


................. आणि 'दिवाण-ए-खास' मध्ये जे घडले तो इतिहास आहे. जोगळेकर त्यांच्या सह्याद्री ग्रंथात म्हणतात,
''आग्र्याच्या किल्ल्यात कोणाची मर्दुमकी प्रकट झाली असेल तर ती श्री शिवछत्रपति महाराजांची. धन्य त्यांची की मोगल साम्राज्य वैभवाच्या कळसावर व सामर्थ्याच्या शिखरावर असताना आणि स्वतः एकाकी असताना त्यांनी शहेनशहाचा जाहीर निषेध केला. धन्य त्यांची की हे वैभव पाहून स्वदेशी परत आल्यावर त्यांनी मोगलांचे अनुकरण करून रंगमहल उठवले नाहीत, तर त्यांच्या प्रतिकारासाठी, त्यांच्याच मूलखातून गोळा केलेल्या लूटी मधून, स्वदेशाच्या स्वातंत्र्य-साधनेसाठी जागोजागी दुर्गम दुर्ग उभारले."

त्या दिवशी नेमके काय घडले हे अधिक जाणून घेण्यासाठी येथे जा ... Threat to Life ...

परिणाम ठरलेला होता. राजे नजरकैदेत टाकले गेले. अर्थ स्पष्ट होता. मृत्यू.... कधी? केंव्हा? कसा? काहीच ठावूक नव्हते. दख्खनेतून जयसिंगने 'शिवाजीस मारू नये. तसे केल्यास इकडे परिस्थिती हाताबाहेर जाईल पण इकडे सुद्धा येऊ देऊ नये' असे पत्र औरंगजेबाला पाठवले. औरंगजेबाने राजांना काबुल मोहिमेवर पाठवायचे ठरवले. अर्थात राजांनी बादशहाची कुठलीच गोष्ट मानायला साफ नकार दिला. परिस्थिती अधिक बिकट होत होती. कुठल्याही क्षणी आपला मृत्यू समोर येईल हे राजांना ठावूक होते. अखेर एक योजना आखली गेली. थरारनाट्य ठरले. राजांबद्दल आग्र्याच्या बाजारात अफवा पसरत होत्या. खुद्द जसवंतसिंग औरंगजेबाला सांगत होता. 'शिवाजीकडे दैवी शक्ती आहे. तो १४-१५ हात लांब उडी मारू शकतो. एका फटक्यात ४०-५० कोस अंतर तो चालून जातो.' दुसऱ्या दिवसापासून बादशाहने स्वतःभोवतीची सुरक्षा अधिक वाढवली. राजांबरोबर असलेले संभाजीराजे मात्र नजर कैदेत नव्हते. त्यांना फिरायला मुभा होती. त्यांच्या सोबत सर्जेराव जेधे आग्र्याबद्दल इत्यंभूत माहिती काढत. योजना हळूहळू पुढे सरकत होती. ७ जून रोजी राजांनी सोबत असलेल्या सर्व सेवक आणि सैन्याला परत दख्खनेत पाठवून दिले. सोबत होते फक्त संभाजीराजे, हिरोजी फर्जंद, सर्जेराव, रघुनाथ बल्लाळ कोरडे, त्र्यंबक सोनदेव डबीर आणि मदारी मेहतर.



१७ ऑगस्ट १६६६. दिवसा-ढवळ्या, १००० सैनिक खडा पहारा देत असताना राजे नजरकैदेतून पसार झाले. ते नेमके कसे निसटले ह्याबाबाबत कुठलाच ठोस पुरावा उपलब्ध नाही. 'मिठाईचा पेटारा'ची कथा जी काल्पनिक आहे ती मुघली कागदपत्रांमधून घेतलेली आहे. औरंगजेबाने शोध मोहीम काढली. पण आता खूप उशीर झाला होता. एक थरारक पलायन यशस्वी झाले होते. राजांनी मुघलांची शेवटची चौकी २० ऑगस्ट रोजी चक्क खोटे दस्तक दाखवून पार केली. चौकीदार होता लातिफखान. औरंगजेबाला जेंव्हा हे कळले तेंव्हा त्याने 'लातिफखान बेवकूफ है' असे उद्गार काढल्याची नोंद मुघल कागदपत्रांमध्ये आहे. आता संभाजीराजांना मथुरेला विश्वासरावांकडे ठेवून शिवाजीराजे वेगाने पुढच्या मार्गाला निघाले. आपल्या ९ वर्षाच्या मुलाला मागे ठेवून जाताना त्यांना काय वाटले असेल...!!! पण एकत्र जाणे धोक्याचे होते तेंव्हा त्यांना काळजावर दगड ठेवून तो निर्णय घ्यावा लागला असणार. तिकडे आग्र्यामध्ये रघुनाथ बल्लाळ कोरडे व त्र्यंबक सोनदेव डबीर हे शिवाजी महाराजांचे अत्यंत जवळचे साथीदार फुलौतखानाला सापडले. शिवाजीराजांचे आग्र्याहून सुटकेचे गुढ उकलवून घेण्यासाठी यांचे आनन्वित हाल करण्यात आले. पण त्या स्वामिनिष्ठांच्या मुखातून 'ब्र' ही निघाला नाही. बोलले असते तर संभाजीराजे मथुरेतून खासच पकडले गेले असते, व दोघांनाही औरंगजेबाने मालामाल केले असते. राजांनी थेट दख्खनेचा रस्ता न धरता मुघलांच्या आवाक्याबाहेरचा मार्ग घेतला होता. मथुरेवरून अलाहाबाद - बनारस - गया - गोंडवन आणि तिथून गोअळकोंडा. वाटेत ठिकठिकाणी शत्रूशी त्यांची गाठ पडली. त्यांनी संन्याश्याचा वेश धारण केला. जास्तीतजास्त प्रवास पायी केला. अथक परिश्रम करून राजे दख्खनेत पोचले. पण अजून संभाजीराजे मथुरेमध्येच होते. शिवाजीराजे राजगडी पोचल्याची बातमी आग्र्याला पोचली तेंव्हा मुघलांची शोध मोहीम थांबली. रस्ता अधिक सुरक्षित झाल्यावर विश्वासराव संभाजीराजांना घेऊन खुद्द राजगडी पोचले. लढण्याची किमान ताकद शिल्लक राहिली होती.


हताश झालेला औरंगजेब आता फारसे काही करू शकत नव्हता. आता काय कधीच काही करू शकत नव्हता. त्याच्या मनात एकच सल होता. 'एक क्षणाच्या निष्काळजीपणाचं पर्यावसान शिवाजीच्या पलायनात झाल्यामुळे खूप मोठी किंमत चुकवावी लागली आहे. मराठ्यांबरोबरच्या युद्धाला आता कधीही अंत नाही हे तो उमगला होता.'

३१ वर्षानंतर '२१ फेब्रुवारी १७०७' रोजी नगर येथे म्हातारा बादशहा हाच सल घेऊन 'अल्लाला प्यारा' झाला. दख्खन तो कधीच जिंकू शकला नाही...

Saturday 14 August 2010

१५ ऑगस्ट १६६४ - कोकणातला रण झंझावात ...

१६५९ ते १६६३ याकाळात अफझलखानाचा वध, पन्हाळ्याहून सुटका, शाहिस्तेखानावर लालमहालात हल्ला आणि अखेर सूरत बेसूरत करून शिवरायांनी १६६३ मध्ये दख्खनेमधल्या मोघल सुभेदाराला पत्र पाठवले. त्यात त्यांनी म्हटले आहे की 'आपल्या भुमीचे संरक्षण करणे हे माझे कर्त्तव्य आहे आणि मी आपले कर्तव्य बजावण्यास कधीही चुकणार नाही' स्वराज्य निर्मिती पाठोपाठ आता त्याचे संरक्षण करण्यासाठी प्रसंगी आक्रमकांशी युद्ध खेळण्यास ते सज्ज झाले होते. दुसरीकडे सुरत लुटीचा प्रचंड धक्का बसलेल्या औरंगजेबाने विजापूरला मराठ्यांविरुद्ध ३० हजार होन मदत करून कोकणात उतरायला भाग पडले. विजापूरचा सरदार खवासखान १६६४ चा पावसाळा संपता-संपता कोकणात उतरला. त्याने थेट कुडाळ काबीज केले.

त्या मागोमाग खुद्द राजांनी सुद्धा कोकणात मुसंडी मारली आणि खवासखानाचा वेंगुर्ला येथे पराभव करून ते जिंकले. या दरम्यान विजापूरचा वतनदार 'बाजी घोरपडे' आणि सावंतवाडीचे 'सावंत' खवासखानला मदत करण्यासाठी येऊन पोचण्याआधी मुधोळ येथे बाजी घोरपडेला मारून राजे कूड़ाळ प्रांती आले आणि तेथे खवासखानाला पुन्हा पराभूत केले. ही लढाई १५ ऑगस्ट १६६४ रोजी घडली. शिवरायांनी ह्या त्रिवर्गास एकत्र न होऊ देता एकएकटे पाडून त्यांचा बिमोड केला यातच त्यांचे रणकौशल्य दिसून येते. खुद्द खवासखान कोकण सोडून विजापूरला माघार घेऊन पळून गेला. तर या युद्धात बाजी घोरपडे मारला गेला. त्याची गादी राजांनी नष्ट केली. (बाजी घोरपडे याने १६४८ मध्ये शहाजी राजांना पकडून देण्यात महत्वाची भूमिका बजावली होती.) सावंत पोर्तुगीझांच्या आश्रयाला गोव्याला पळाला. राजांनी त्याचा माग काढत काही पोर्तुगीझ भूभाग देखील काबीज केला. अखेर पोर्तुगीझांनी खंडणी म्हणून अनेक नजराणे राजांना पाठवून दिले.

कुडाळ येथून राजांनी मासाहेब जिजाऊ यांना पत्र पाठवले.

पूर्ण पत्र येथे वाचा. --- "स्वामींचे पुण्यप्रतापें आज्ञेप्रमाणे घडून आलें."

१६६४ मध्ये कोकणात बसलेले मराठ्यांचे बस्तान अखेरपर्यंत कोणीच उखडू शकले नाही.....

१४ ऑगस्ट १६६० - चाकण उर्फ़ संग्रामदुर्गचा संग्राम ...

अफझलखान वधाने हादरलेल्या आदिलशहाने दुप्पट मोठी फौज देऊन रुस्तुम-ए-जमा याला पुन्हा मराठ्यांवर हल्ला करायला धाडले. त्याच्या सोबत होता बापाच्या वधाचा सूड उगवायला आलेला अफझलखानाचा मुलगा फाझलखान. ह्या प्रचंड फौजेचा शिवरायांच्या नेतृत्वखाली पराभव करत मराठ्यांनी कोल्हापूर पावेतो मजल मारली आणि आदिलशाहीचा सर्वात बळकट असा 'पन्हाळगड' काबीज केला.

आता स्थिती अजून हाताबाहेर जायच्या आधी आदिलशहाने सिद्दी जोहरला त्याहूनही अधिक फौज देऊन मराठ्यांवर पाठवले. (ह्यावरून कल्पना करा की ज्या शक्तींच्या विरुद्ध राजे स्वराज्य उभे करत होते त्या किती बलाढ्य होत्या) सिद्दीने पन्हाळ्याला वेढा घातला आणि मराठ्यांच्या हालचाली थांबल्या. वेढा उठवण्यासाठी नेतोजी पालकर बेळगाव, अथणी आणि खुद्द विजापूरपर्यंत धडका मारत होता... वेढा उठवायची शर्थ करत होता. पण त्याला यश येत नव्हते.

अशात ६ महिने होऊन गेले. पावसाळा उजाडला तरी शिवराय पन्हाळ्यावर वेढ्यामध्ये बंदिस्त होते. तिकडे उत्तर सीमेवर मुघल फौजेने स्वराज्यावर हल्ला चढवला होता. औरंगाबाद वरून निघालेल्या शाही फौजा शास्ताखानाच्या नेतृत्वाखाली थेट पुण्याला पोचल्या होत्या. शास्ताखान स्वराज्यावर चालून आला तो थेट संग्रामदुर्गावर. हा किल्ला सहज आपल्या हातात पडेल असा त्याचा भ्रम असावा. पण ती विसरला असावा की उंचावर असलेला १ सैनिक खालच्या १० सैनिकांच्या बरोबर असतो. शिवाय किल्लेदार होते फिरंगोजी नरसाळा. एक खरे-खुरे लढवय्ये मराठा. पावसाळ्याची सुरवात होणार होती म्हणून किल्ल्यात दाणा-गोटा पुरेपूर भरला होता. किल्ल्यात ३००-३५० फौज होती. वेढा पडला तरी किल्ला सहज सहजी हाती पडायची सुतराम शक्यता नव्हती.

मुघलांनी वेढा घालून मोर्चे बांधले आणि तोफांचा भडीमार करू लागले. मुघल सैनिक किल्ल्याच्या तटा-बुरुजाशी लगट करू लागले की त्यांच्यावर गोफणगुंडे बसायचे. एक अत्यंत साधे पण सर्वात लांब जाणारे प्रभावी असे अस्त्र होते ते आणि अर्थात मराठे त्यात पूर्णपणे निष्णात होते. फिरंगोजी नरसाळा यांनी अवघ्या ३००-३५०च्या फौजेनिशी किल्ला तब्बल ५५ दिवस लढवला. अखेर मुघलांनी तटापर्यंत पोहोचायला भुयार खोदायला सुरवात केली. त्यांना किल्ल्यातून प्रचंड प्रतिकार होत होता. अखेर मुघलांना १४ ऑगस्ट १६६० रोजी अश आले. भुयार खणून मुघलांनी तटबुरुज उडवले. किल्ल्याची एक बाजू उघडी पडली.  हातघाईची प्रचंड लढाई झाली. आपल्या सैनिकांची वाताहत होणार हे लक्ष्यात येताच त्यांना महाराजांचे शब्द नक्कीच आठवले असतील.

राजे म्हणत,'आपण राखून गनीम घ्यावा. माणूस खराब होणार नाही याची काळजी घ्यावी'

शेवटी फिरंगोजी नरसाळा यांनी किल्ला मुघलांच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला. सर्व फौजेला घेऊन ते थेट राजगडी आले. महाराज तोपर्यंत वेढ्यातून सुटून राजगडी पोचले होते. किल्ला हातचा गेला म्हणून महाराजांची भेट त्यांनी खिन मनानेच घेतली असेल. पण आपल्या प्रत्येक माणसाची राजांना अचूक ओळख होती. ते फिरंगोजीना म्हणाले असतील,'फिरंगोजी. केवढा पराक्रम केला. असे हताश का?'

किल्ला हातातून गेला तरी फिरंगोजीच्या पराक्रमावर खुश होउन शिवाजीराजांनी फिरंगोजी नरसाळा यांना भूपाळगडाची किल्लेदारी, एक भरजरी दुशेला व एक मानाची तलवार भेट दिली. फिरंगोजी ताठ मानेने आणि नव्या उत्साहाने आपल्या नव्या मोहिमेवर निघाले...

Saturday 7 August 2010

स्वराज्याची पहिली लढाई - ८ ऑगस्ट १६४८

१६४८ च्या सुरवातीला आदिलशाहीचे पुरंदर आणि सिंहगड असे मात्तबर किल्ले शिवाजी राजांनी ताब्यात घेतले. अखेर शिवाजी महाराजांच्या वाढत्या कारवाया लक्षात घेउन आदिलशाहने जुलै १६४८ मध्ये शिवाजी राजांवर हल्ला करण्याचे ठरवले. खुद्द शहाजी राजांची साथ असल्याशिवाय शिवाजी हे धाडस करणार नहीं अशी खात्री असल्याने आदिलशहाने शहाजी राजांना २५ जुलै १६४८ रोजी कपटाने कैद केले आणि शहाजीराजांच्या बंगळूरप्रांती आदिलशाही फ़ौज धाडली. तर एक फ़ौज पुण्याच्या दिशेने चालून आली. शहाजीराजे खुद्द कैदेत होते मात्र बंगळूरवरचा हल्ला त्यांचे थोरले पुत्र संभाजीराजे (शिवरायांचे थोरले बंधू) यांनी यशस्वीपणे परतावला.

दुसरीकडे अवघ्या १८ वर्षाचे शिवाजी राजे आदिलशाही सैन्याला भिडायला सज्ज झाले होते. पुणे - सातारा मार्गावर असणाऱ्या खळत-बैलसर येथे स्वराज्याची पहिली मोठी लढाई झाली. ही लढाई ८ ऑगस्ट १६४८ रोजी झाली. आदिलशाही सरदार फत्तेखानाच्या फौजेचा शिवाजी राजांनी सपशेल पराभव केला. फत्तेखानाच्या ३००० फौजेविरुद्ध खुद्द शिवाजीराजे चालून गेले. ह्या लढाईमध्ये फत्तेखान जबर जखमी होउन पसार झाला. तर पुरंदर-सासवड येथे आदिलशाही सरदार हैबतराव याच्याशी दुसऱ्या एका लढाइत 'बाजी पासलकर' यांना वीरमरण आले.

आदिलशाहीचा पहिला मोठा हल्ला मराठा फौजेने परतावला होता. मात्र नुकतेच बाळसे धरलेल्या स्वराज्यापुढील धोका टाळण्यासाठी आणि शहाजीराजांची सुटका करण्यासाठी शिवाजीराजांनी सिंहगड आदिलशाहीला परत केला.