Saturday, 14 August 2010

१५ ऑगस्ट १६६४ - कोकणातला रण झंझावात ...

१६५९ ते १६६३ याकाळात अफझलखानाचा वध, पन्हाळ्याहून सुटका, शाहिस्तेखानावर लालमहालात हल्ला आणि अखेर सूरत बेसूरत करून शिवरायांनी १६६३ मध्ये दख्खनेमधल्या मोघल सुभेदाराला पत्र पाठवले. त्यात त्यांनी म्हटले आहे की 'आपल्या भुमीचे संरक्षण करणे हे माझे कर्त्तव्य आहे आणि मी आपले कर्तव्य बजावण्यास कधीही चुकणार नाही' स्वराज्य निर्मिती पाठोपाठ आता त्याचे संरक्षण करण्यासाठी प्रसंगी आक्रमकांशी युद्ध खेळण्यास ते सज्ज झाले होते. दुसरीकडे सुरत लुटीचा प्रचंड धक्का बसलेल्या औरंगजेबाने विजापूरला मराठ्यांविरुद्ध ३० हजार होन मदत करून कोकणात उतरायला भाग पडले. विजापूरचा सरदार खवासखान १६६४ चा पावसाळा संपता-संपता कोकणात उतरला. त्याने थेट कुडाळ काबीज केले.

त्या मागोमाग खुद्द राजांनी सुद्धा कोकणात मुसंडी मारली आणि खवासखानाचा वेंगुर्ला येथे पराभव करून ते जिंकले. या दरम्यान विजापूरचा वतनदार 'बाजी घोरपडे' आणि सावंतवाडीचे 'सावंत' खवासखानला मदत करण्यासाठी येऊन पोचण्याआधी मुधोळ येथे बाजी घोरपडेला मारून राजे कूड़ाळ प्रांती आले आणि तेथे खवासखानाला पुन्हा पराभूत केले. ही लढाई १५ ऑगस्ट १६६४ रोजी घडली. शिवरायांनी ह्या त्रिवर्गास एकत्र न होऊ देता एकएकटे पाडून त्यांचा बिमोड केला यातच त्यांचे रणकौशल्य दिसून येते. खुद्द खवासखान कोकण सोडून विजापूरला माघार घेऊन पळून गेला. तर या युद्धात बाजी घोरपडे मारला गेला. त्याची गादी राजांनी नष्ट केली. (बाजी घोरपडे याने १६४८ मध्ये शहाजी राजांना पकडून देण्यात महत्वाची भूमिका बजावली होती.) सावंत पोर्तुगीझांच्या आश्रयाला गोव्याला पळाला. राजांनी त्याचा माग काढत काही पोर्तुगीझ भूभाग देखील काबीज केला. अखेर पोर्तुगीझांनी खंडणी म्हणून अनेक नजराणे राजांना पाठवून दिले.

कुडाळ येथून राजांनी मासाहेब जिजाऊ यांना पत्र पाठवले.

पूर्ण पत्र येथे वाचा. --- "स्वामींचे पुण्यप्रतापें आज्ञेप्रमाणे घडून आलें."

१६६४ मध्ये कोकणात बसलेले मराठ्यांचे बस्तान अखेरपर्यंत कोणीच उखडू शकले नाही.....

2 comments:

  1. हे खूपच छान आहे!! माझ्या एका मित्राने असे कॅलेंडर छापायचे ठरवले होते! पण एव्हढी बरोब्बर माहिती तुला कुठून मिळते??

    ReplyDelete
  2. अनघा.. काय गंमत आहे.. तुमचाच ब्लॉग वाचत होतो आणि तुमची प्रतिक्रिया आली... :)

    सदर माहिती विविध संदर्भ ग्रंथामधून संकलित केलेली आहे. काहीही वाचायला घेतले की सोबतीला टिपण देखील काढले जाते.. :)

    ReplyDelete