Saturday, 7 August 2010

स्वराज्याची पहिली लढाई - ८ ऑगस्ट १६४८

१६४८ च्या सुरवातीला आदिलशाहीचे पुरंदर आणि सिंहगड असे मात्तबर किल्ले शिवाजी राजांनी ताब्यात घेतले. अखेर शिवाजी महाराजांच्या वाढत्या कारवाया लक्षात घेउन आदिलशाहने जुलै १६४८ मध्ये शिवाजी राजांवर हल्ला करण्याचे ठरवले. खुद्द शहाजी राजांची साथ असल्याशिवाय शिवाजी हे धाडस करणार नहीं अशी खात्री असल्याने आदिलशहाने शहाजी राजांना २५ जुलै १६४८ रोजी कपटाने कैद केले आणि शहाजीराजांच्या बंगळूरप्रांती आदिलशाही फ़ौज धाडली. तर एक फ़ौज पुण्याच्या दिशेने चालून आली. शहाजीराजे खुद्द कैदेत होते मात्र बंगळूरवरचा हल्ला त्यांचे थोरले पुत्र संभाजीराजे (शिवरायांचे थोरले बंधू) यांनी यशस्वीपणे परतावला.

दुसरीकडे अवघ्या १८ वर्षाचे शिवाजी राजे आदिलशाही सैन्याला भिडायला सज्ज झाले होते. पुणे - सातारा मार्गावर असणाऱ्या खळत-बैलसर येथे स्वराज्याची पहिली मोठी लढाई झाली. ही लढाई ८ ऑगस्ट १६४८ रोजी झाली. आदिलशाही सरदार फत्तेखानाच्या फौजेचा शिवाजी राजांनी सपशेल पराभव केला. फत्तेखानाच्या ३००० फौजेविरुद्ध खुद्द शिवाजीराजे चालून गेले. ह्या लढाईमध्ये फत्तेखान जबर जखमी होउन पसार झाला. तर पुरंदर-सासवड येथे आदिलशाही सरदार हैबतराव याच्याशी दुसऱ्या एका लढाइत 'बाजी पासलकर' यांना वीरमरण आले.

आदिलशाहीचा पहिला मोठा हल्ला मराठा फौजेने परतावला होता. मात्र नुकतेच बाळसे धरलेल्या स्वराज्यापुढील धोका टाळण्यासाठी आणि शहाजीराजांची सुटका करण्यासाठी शिवाजीराजांनी सिंहगड आदिलशाहीला परत केला.

6 comments:

 1. सेनापती...

  पोस्ट उत्तम झाली आहे.

  ReplyDelete
 2. आपण आपल्या ब्लोग वर मराठा इतिहासाची दैनदिनी दिल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत, आम्ही आपल्या या पोस्ट ची लिंक आमच्या सगळ्या मित्रांना पाठवून त्यांना इतिहाची आठवण करून देणार आहोत

  ReplyDelete
 3. स्वराज्यावरचा हा हल्ला तर मराठ्यांनी थोपाविलाच होता परंतु जिंजीनजिक शहाजीराजांना अटक झाली होती जवळपास १० महिन्यानंतर त्यांची सुटका झाली त्या सुटकेच्या बदल्यात सिंहगडची आत शिवाजी महाराजांना घालण्यात तेव्हा ५० कोंढाणे महाराजांवरून ओवाळून टाकले तरी ते कमीच असे उद्गार शिवाजी महाराजांच्या मुखातून आले
  संदर्भ-श्रीमानयोगी
  तुझ्याकडून भरपूर माहिती मिळते मित्रा त्यासाठी धन्यवाद
  ही माझी ब्लॉग लिंक -abhishekkumbhar.blogspot.com
  एकदा बघाच

  ReplyDelete
 4. ईतिहासाची ही दैनंदिनी सुरु केल्याबद्दल शतशः धन्यवाद. माझा ७ वर्षांचा मुलगा तुझ्या ब्लॉग चा प्रचंड चाहता आहे. एकवेळ इतिहासाचे पुस्तक तो वाचण्यासाठी घेणार नाही पण शिवाजी महाराजांचे या स्वराज्यासाठी त्यांनी केलेल्या कारवाया त्याला खुप आवडतात. तुझ्या या ब्लॉग मधेच मला त्यानी मांडलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळतात तेव्हा हि दैनंदिनी अशीच उत्तरोतर बहरत जावो ही सदिच्छा!

  ReplyDelete
 5. अनिरुद्ध.. खरेतर आपलेच खुप आभार.. अश्या प्रतिक्रियांमुळे लिखाणाला अजून उत्साह मिळत असतो.. आपल्या मुलाला ब्लॉग आवडतो हे ऐकून तर अतीव आनंद झाला... आपल्या भावी पिढीला शिवरायांची थोरवी कळावी ह्यापेक्षा अधिक चांगले कार्य काय...

  ReplyDelete
 6. धन्यवाद सेनापती ...स्वराज्याच्या पहिल्या लढाई बध्ढाल सांगितले. माझ्या वाचनात असे आहे की स्वराज्याची पहिली लढाई अमावास्येला झाली, आणि प्रथामेला महाराज विजयी झाले. अमावस्या असली म्हणून काय झालं... आमावस्येला लढलो तर प्रथामेला विजय घेवून परतू असे उदगार देखील असावेत महाराजांच्या मुखातून. असल्या अंधश्रद्धेला कधीच थारा नव्हता, म्हणूनच "प्रतीपाचंद्रलेखेव..." प्रमाणे स्वराज्याचा चंद्र आणखीन उज्वल होत गेला.

  ReplyDelete