Wednesday 3 November 2010

दिनविशेष नोव्हेंबर - अफझलखान वध : शिवप्रताप दिवस ...


सन १६५५ - १६५६...

दख्खनेमधल्या राजकीय घडामोडींचा फायदा उचलून राजांनी जानेवारी १६५६ मध्ये जावळी मारली. शिवरायांनी 'तुम्ही कुठले राजे' असे म्हणणाऱ्या मोरेची मुजोरगिरी मोडून काढली. खुद्द मोरे स्वतःच्या दोन्ही मुलांसकट ठार झाला. वाई ते थेट रायरी असा विस्तीर्ण प्रांत स्वराज्यात सामील झाला. राजांसाठी दक्षिण कोकणद्वार खुले झाले. राजांनी तातडीने पावले उचलत भोरप्याच्या डोंगराचा कायापालट करीत प्रतापगड बांधायला घेतला. बांधकामाची सर्व जबाबदारी मोरोपंत पिंगळे यांसकडे दिली. मराठ्यांच्या कोकणातील हालचालींना वेग आला. ह्या सर्व प्रकाराने संतप्त झालेल्या औरंगजेबाने २२ एप्रिल १६५७ रोजी राजांना पत्र धाडले आणि कोकणातले सर्व महाल (प्रांत) मुघलांच्या हवाली करण्यास बजावले. औरंगजेब त्यावेळेस दख्खनेचा मुघल सुभेदार होता. ह्या पत्रास प्रत्युतर म्हणून राजांनी थेट जुन्नर येथे हल्लाबोल करत मुघली बाजारपेठ लुटली. आता औरंगजेब प्रचंड भडकला. मुघलांनी पुणे, चाकण आणि आसपासच्या प्रदेशात लुट चालवली.

दुसरीकडे मुघलांनी विजापूर विरुद्ध युद्ध सुरू केले होते. त्यांचे कल्याणी आणि बिदर किल्ले मुघलांनी जिंकून घेतले होतेच. मात्र स्वतःला तख्तनशीन करून घेण्यास आतुर असलेला औरंगजेब दिल्लीकडे रवाना होण्यासाठी आतुर झाला होता. त्याने विजापूर बरोबर तह केला आणि तो उत्तरेकडे निघाला. जाता जाता पुन्हा एकदा मराठ्यांनी उत्तर कोकणात उतरत कल्याण-भिवंडी-शहापूर काबीज करत मुघल आणि विजापूरला दणका दिला. माहुली हा अत्यंत महत्वाचा असा किल्ला मराठ्यांनी जिंकून घेतला. १६५७ च्या आसपास विजापूरला अली अदिलशाह मरण पावला. वाई प्रांताचा सुभेदार असलेला अफझलखान आता दक्षिणेत मोहिमेवर होता. ह्या दरम्यान शिवरायांनी आपली संपूर्ण ताकद कोकणात वर्चस्व वाढवण्यात घालवली. सोबतीने आरमाराची सुरवात होत होतीच. पहिल्या २० युद्ध नौका त्यांनी बांधायला घेतल्या होत्या. सिद्दी आणि पोर्तुगीझ सतर्क झाले होते. अशा प्रकारे अवघ्या ३-४ वर्षात मराठ्यांनी स्वतः प्रबळ होता होता आपले शत्रू वाढवून घेतले. मुघल, आदिलशाह, पोर्तुगीझ आणि सिद्दी हे मराठ्यांच्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष्य ठेवून होते.

बादशहा झाल्या-झाल्या औरंगजेबाने आपला मुलगा मुअझ्झम यांस दख्खनेचा सुभेदार म्हणून औरंगाबाद येथे पाठवले. ही बहुदा मुघली रीत होती. कुठलाही बादशाहा आपल्या मुलाला दिल्लीपासून दूर आणि सर्वात कठीण अश्या दख्खन सुभेदारी वर पाठवत असावा बहुदा. मुअझ्झम मात्र विजापूर विरुद्ध लढायच्या अजिबात तयारीत नव्हता. मुघल आता एक वेगळीच खेळी खेळले. त्यांनी विजापूरला मराठ्यांविरुद्ध युद्ध करण्यास भाग पडले. पूर्वी वाईचा सुभेदार राहिलेला आणि आता विजापूर दरबारातला मानाचा सरदार अफझलखान २२ हजाराची फौज घेऊन १६५९ च्या पावसाळ्याआधी स्वराज्यावर हल्ला करायला, त्याला नेस्तोनाबूत करायला निघाला होता. 'शिवाजी बरोबर कुठल्याही प्रकारे तह करू नकोस. त्याला जिवंत नाहीतर मृत विजापूर दरबारात हजर कर' असे स्पष्ट आदेश त्याला होते. येता-येता खानाने तुळजापूर येथे विध्वंस करीत स्वतःच्या 'बुतशिकन' असल्याची द्वाही फिरवली. वाटेवरून त्याने १६ जून १६५९ रोजी कान्होजी नाईक जेधे यांना पत्र लिहिले आणि 'मावळातल्या सर्व वतनदारांबरोबर आम्हास येऊन मिळा' असा निरोप पाठवला. कान्होजी जेधे चिंताग्रस्त होऊन राजांना भेटायला राजगडी पोचले. आता लढाईची अंतिम रणनीती ठरवणे भाग होते.


नव्याने तयार केलेला जावळीमधला प्रतापगड राजांनी खानाविरुद्ध लढण्यास नक्की केला. एकतर सर्वश्रुत कारण म्हणजे खानाची जडशीळ फौज. पण अजून एक कारण म्हणजे शिवरायांची लढाईची रणनीती. शक्यतो लढाई ही आपल्या प्रदेशात न होता सीमेवर किंवा बाहेर व्हावी ह्या करता ते नेहमी स्वराज्याच्या सरहद्दीवरील किल्ले नक्की करीत. ज्या किल्ल्यावर मी असीन तिथे अफझलखान पोचणार हे राजांना ठावूक होते आणि म्हणूनच त्यांनी प्रतापगड जवळ केला. लढाईचे क्षेत्र खानाने नव्हे तर राजांनी निवडले होते. नकळतच खानाचा पहिला पराभव झाला होता.


सप्टेंबर महिन्याच्या सुरवातीला एक वाईट बातमी राजगडावरून प्रतापगडी पोचली. गेली २-३ वर्षे दुखणे घेऊन आयुष्य ढकलणाऱ्या महाराणी सईबाईंचा मृत्यू झाला होता. शंभू बाळाची आई गेली होती. राजांची राणी गेली. स्वराज्यावर दुख्खाचे आकाश कोसळले. राजे राजगडी पोचले आणि आवश्यक ते विधी पूर्ण करून जिजाऊ मासाहेबांचा 'यशस्वी भव:' आशीर्वाद घेऊन ते पुन्हा प्रतापगडी येऊन ठाकले. दुख्ख करीत बसायला आता त्यांना अजिबात वेळ नव्हता. अफझलखानाचे पत्र त्यांच्याकडे येऊन पोचले होते.

पत्रात खान म्हणत होता (स्वैर अनुवाद)

१. विजापूर दरबाराने निजामशहा कडून जिंकून घेतलेला आणि मुघलांना तहात दिलेला दुर्गम दुर्गांचा हा संपूर्ण डोंगरी प्रदेश तू बळकावून बसला आहेस. तो परत कर.
२. कोकणात राजपुरीच्या राजाला (दंडा राजपुरी येथील सिद्दी) त्रास देणे तू ताबडतोब बंद कर.
३. शत्रूस प्रवेश करण्यास दुर्गम असलेला हा चंद्ररावचा प्रदेश (जावळी) तू मला परत कर.
४. तू कल्याण आणि भिवंडी काबीज केलीस आणि मला कळलाय की तिथे तू मशीद सुद्धा जमीनदोस्त केलीस.
५. तू मुसलमानांना लुटलेस आणि त्यांचा अपमान केला आहेस.
६. इतकेच नव्हे तर तू इस्लामचा अपमान करून स्वतःच्या हाताखाली मुसलमानांना कामावर ठेवले आहेस.
७. तू स्वतःला एक स्वयंघोषित राजा म्हणून, कोणालाही न घाबरता हवे ते निर्णय देतो आहेस. म्हणून तुला संपवायला मला आदिलशहाने पाठवले आहे.
 ८. मुसेखान आणि माझे बाकीचे सैन्य तुझ्याविरुद्ध लढण्यास अतिशय उत्सुक आहे. मी कधी एकदा त्यांना जावळीवर हल्ला करावयास सांगतो असे झाले आहे.
९. सिंहगड आणि लोहगड सारखे दणकट किल्ले, पुरंदर आणि चाकण सारखे मोक्याचे किल्ले, या शिवाय भीमा आणि नीरा नद्यांच्या मधला सर्व प्रदेश मुकाट्याने दिल्लीच्या बादशहाला परत कर.

पत्र वाचल्यावर राजांनी काय विचार केला असेल? शरण जावे? कदापि नाही. तह म्हणजे साक्षात मृत्यू हे राजांना ठावूक होते. अश्या कसोटीच्या क्षणी राजांनी एक वेगळाच व्युव्ह रचला. स्वतःशीच स्मित करीत त्यांनी हे पत्र खानाला लिहिले असावे. (स्वैर अनुवाद)

१. कर्नाटकाच्या सर्व राजांना हरवणारे खुद्द आपण माझ्या भेटीला आलात ह्या सारखा आनंद कोणता.
२. तुम्ही तर या पृथ्वीतलावरचे एक दागिने आहात. तुमच्या बरोबर युद्ध म्हणजे आगीशी लढाई.
३. तुम्ही खरच येथे या आणि मनभरून जावळीचे दर्शन घ्या.
४. तुम्ही लवकरात लवकर इकडे आलात तर बरे होईल, म्हणजे माझी सर्व भीती निघून जाईल.
५. मला मुघल आणि विजापूरच्या सैन्याबद्दल अतिशय आदर आहे ज्यांच्याकडे तुमच्यासारखे पराक्रमी योद्धे आहेत.
६. येथे नक्की या. मी तुम्हाला माझे सर्व किल्ले सुपूर्त करीन. अगदी जावळी देखील.
७. तुमचे रूप म्हणजे एखाद्या वीर योद्धयाप्रमाणे आहे. आपली भेट होईल तेंव्हा मी माझी तलवार तुम्हाला सुपूर्त करीन.
८. जावळीच्या ह्या घनदाट, खोल आणि दूरवर पसरलेल्या जंगलात तुमच्या सैन्याला जगातल्या सर्वोच्च सुविधा मिळतील.

ह्या पत्राने अफझलखानावर नेमका काय परिणाम झाला माहित नाही पण स्वतःचे संपूर्ण जडशीळ सैन्य वाई तळावर ठेवून मोजक्या सैन्यासह खान जावळीमध्ये शिरला. योजिल्याप्रमाणे उन्मत्त हत्तीला जंगलात खेचून आणून मारायचा डाव लवकरचं फत्ते केला जाणार होता.


१० नोव्हेंबर १६५९ ...

पहाटे-पहाटे शिवरायांनी नक्कीच आई तुळजा भवानीची मनोभावे प्रार्थना केली असणार. ठरल्याप्रमाणे शिवाजी राजे आणि अफझल खान एका शामियान्यात भेटले. राजांचा वकील 'पंताजी पंडित' तर खानाचा वकील 'कृष्णाजी भास्कर' यांच्याशिवाय दोघांसोबत १०-१० अंगरक्षक होते. शिवाजी राजांच्या अंगरक्षकांमध्ये संभाजी कावजी, कातोजी इंगळे, सिद्दी इब्राहीम असे काही (जीवा महालाचे नाव माझ्या तरी वाचण्यात आलेले नाही) तर खानाच्या अंगरक्षकांमध्ये रहीमखान, पहलवानखान, शंकराजी मोहिते (सय्यद बंडाचे नाव देखील माझ्या तरी वाचण्यात आलेले नाही) आणि असे काही सैनिक होते.

गडावरून निघताना राजांनी स्वतःकडे एक तलवार, कट्यार आणि वाघनखे ठेवली होती. खानाकडे देखील एक तलवार आणि कट्यार होती. राजांना बघतच तो म्हणाला.'मी तुला प्रत्यक्ष सर्व शक्तिशाली विजापूर दरबारात घेऊन जाऊन आदिलशहासमोर हजर करतो. घाबरू नकोस. हात मिळवणी कर आणि मला आलिंगन दे.' असे म्हणून त्याने राजांना मगरमिठीत घेतले. उंचीला जास्त असणाऱ्या खानाने राजांचे डोके दाबून तो आता पाठीवर कट्यारीने वार करणार तेवढ्यात राजांनी एका क्षणात आपली मान त्या मगरमिठीतून सोडवून घेऊन वाघनखे खानच्या पोटात खुपसली. काही अंतरावर उभे असणाऱ्या अंगरक्षक आणि कृष्णाजी भास्कर यांनाच नव्हे तर खुद्द खानाला देखील अनपेक्षित असा हा हल्ला असणार. पापणी लावण्यास वेळ लागत नाही इतक्या कमी वेळात राजांनी खानाचा कोथळा बाहेर काढला होता. पुढच्या काही क्षणात संभाजी कावजीने खानाचे मुंकडे धडावेगळे केले. कृष्णाजी भास्कर आणि खानाचे सर्व अंगरक्षक तिथल्या तिथे कापले गेले. राजे पंताजी आणि अंगरक्षक घेऊन गडाकडे त्वरित रवाना झाले असणार.


********************************************************************************
१.
कवी भूषण म्हणतो,

एक कहे कल्पद्रुम है, इमि पूरत है सबकी चितचाहे ।
एक कहे अवतार मनोज, की यो तनमे अति सुंदरता है ।
भुषण एक कहे महि इंदु यो, राजविराजत बाढयौ महा है ।
एक कहे नरसिंह है संगर, एक कहे नरसिंह सिवा है ॥

भाषांतर :
यास कोणी कल्पवृक्ष म्हणतात, कारण हा सर्वांचे मनोरथ पूर्ण करतो.हा सौंदर्यसंपन्न असल्याने कोणी याला मदनाचा अवतार म्हणतात. भूषण याला पृथ्वीवरचा चंद्र म्हणतो, कारण याचे राज्य कलेकलेने वाढत आहे. कोणी याच्या युद्धातील पराक्रमामुळे यास सिंह म्हणतात तर कोणी प्रत्यक्ष नृसिंह भगवानच समजतात. कारण ज्याप्रमाणे नरसिंहाने हिरण्यकश्यपूचे पोट फाडले तद्वतच शिवरायांनी आपल्या वाघनखांनी अफजलखानाची आतडी बाहेर काढली.

********************************************************************************

अवघ्या काही क्षणात चित्र पालटले होते. शिवाजी आता खानाला भेटणार म्हणजे तह करणार ह्या विचारात असलेल्या खानाच्या फौजेला कसलाच मागमूस लागला नव्हता. तिकडे मराठ्यांनी इशाऱ्याचे कर्णे फुंकले. फौज तयार होतीच. खानाच्या सोबत आलेल्या उरल्या-सुरल्या फौजेवर बांदल - शिळीमकर यांनी हल्ला चढवला, वाई तळावर असलेल्या फौजेचा सेनापती नेताजी पालकरने धुव्वा उडवला. त्याने मुसेखान आणि फाझलखान यांची दाणादाण उडवून दिली. मोरोपंतांनी पारघाटावर संपूर्ण नियंत्रण मिळवले. अवघ्या काही तासात मराठ्यांनी विजापूरच्या फौजेचा विनाश करत एक प्रचंड मोठा विजय मिळवला. प्रतापगडाच्या साथीने शिवप्रताप घडला. ६५ हत्ती, ४००० घोडे, १२०० उंट, ३ लाख रुपयाचे दागिने, मोठ्या प्रमाणावर उंची कापड, ७ लाख रुपये नकद याशिवाय तोफा, बंदुका आणि सर्व प्रकारचे युद्ध साहित्य मराठ्यांच्या हाती लागले. खानाचे मुंडके राजांनी राजगडी जिजाऊ मासाहेबांना भेट म्हणून पाठवले असे म्हणतात. राजगडाच्या बालेकिल्ल्याच्या डाव्या कोनाड्यात ते पुरलेले आहे अशी एक आख्यायिका प्रसिद्ध आहे. (शहाजी राजांना अटक करणारा आणि थोरल्या संभाजी राजांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या खानाचा मृत्यू हे जिजाऊ मासाहेबांचे एक ध्येय होते. ते राजांनी पूर्ण केले.) मराठ्यांचा आत्मविश्वास कैक पटीने वाढला. नव्या जोमाने राजे पुढच्या मोहिमेच्या आखणीला लागले. नेताजी पालकर ला कोकणात पाठवून ते खुद्द सातारा, सांगली आणि कोल्हापूर प्रांती धडक मारायला निघाले...



********************************************************************************

२.
इतिहासाचे अभ्यासक 'नरहर कुरुंदकर' यांनी अफझलखान वध याबद्दल अतिशय उत्तम विचार मांडले आहेत. ते म्हणतात,"खानवधात एक प्रश्न नेहमी विचारला जातो ते म्हणजे दगा कोणी दिला? राजांनी की खानाने? समजा खान सुरक्षित परतला असता तर पुढच्या भेटीत शिष्टाचार म्हणुन राजांना खानभेटीस त्याच्या गोटात जाणे भाग पडले असते. प्रतापगडाच्या पायथ्याशी आलेला... नव्हे आणलेला खान परत जिवंत जाणे शक्य नव्हते. ती व्यवस्था शिवरायांनी करून ठेवली होती. खानवधापाठोपाठ त्याच्या फौजेवर बांदल - शिळीमकर यांनी हल्ला चढवणे, वाई तळावर नेताजी पालकरने विध्वंस करणे, मोरोपंतांनी पारघाटावर हल्ला करणे आणि पूर्ण ताकदीनिशी शक्य तितक्या लवकर कोल्हापुर प्रांती धडक मारणे एवढा व्यापक दृष्टिकोन आणि नेमके नियोजन ह्यामागे आहे. अनापेक्षित घाव घालून जग थक्क करता येते पण त्या थक्क अवस्थेतून बाहेर येईस्तोवर शिवराय काही स्थिर कामे करत असतात. ते विजयोस्तव साजरे करत बसत नाहीत. खानवधापाठोपाठ कोल्हापुर - पन्हाळा जिंकणे, कुडाळ मारून विजापुर प्रांती धडक मारणे आणि पुढच्या १८ दिवसात १२०००च्या फौजेचा पराभव करून लूट मारणे व ती फौजा दुप्पट करण्यात वापरणे, आणि ह्या सर्वातून आदिलशाही सावरेपर्यंत जास्तीत जास्त प्रदेश जिंकणे, हे सैनिकी कौशल्य.

"स्थायी यश मिळणाऱ्या मोहिमेचा आरंभ म्हणुन अनपेक्षित धक्याला अर्थ असतो पण तो धक्का देऊन थक्क करणे आणि भानावर येण्यापूर्वी स्थिर विजय मिळवणे हा राजकीय वास्तववाद म्हणजे छत्रपति शिवराय... "
********************************************************************************
३.

खाली समर्थ रामदास स्वामींनी महाराजांना लिहीलेल्या पत्राची काही कवनं आहेत. यातील प्रत्येक ओळीतील पहिल्या शब्दाच्या, पहिले अक्षर एकत्र करून एक वाक्य तयार होते ते म्हणजे - 'विजापूरचा सरदार निघाला आहे'. हे अफझलखानाबाबत असल्याचे ईमेल फिरत असतात. तसे असल्यास हे पत्र १६५९ चे असावे असा अंदाज बांधता येतो. अर्थात, रामदासांचा संपर्क महाराजांशी तेंव्हापासून होता असे काही पुरावे उपलब्ध नाहीत.. फक्त माहिती म्हणून सदर पत्र येथे दिले आहे.

विवेके करावे कार्यसाधन ।
जाणार नरतनू हे जाणोन ।
पूढिल भविष्यार्थी मन ।
हाटोची नये ।।१।।

चालू नये असन्मार्गी ।
त्यता बाणल्या अंगी ।
घुवीर कृपा ते प्रसंगी ।
दास महात्म्य वाढवी ।।२।।

जनीनाथ आणि दिनकर ।
नित्य करिती संचार ।
घालिताती येरझार ।
लाविले भ्रमण जगदिशे ।।३।।

दिमाया मूळ भवानी ।
हे सकल ब्रम्हांडांची स्वामिनी ।।


१. ओंकार यांच्याकडून साभार.
२. नरहर कुरुंदकर यांच्या 'छत्रपती शिवाजी महाराज - जीवन रहस्य' आणि 'श्रीमान योगी' मधील पत्रातून साभार.
३. राजेश खिलारी यांच्याकडून साभार.

दुसरा आणि तिसरा फोटो राजेश खिलारी यांच्याकडून साभार...

19 comments:

  1. अहाहा.. प्रत्येक दिनविशेषाची पोस्ट वाचायला मी उत्सुक असतो कारण ती वाचून झाल्यावर अंगावर असं रोमांच उभं राहतं ना की बास !! स्टार प्रवाहवरचा अफझलवध आत्ता नुकताच नेटवर बघितला. तेव्हाही असाच भारावून गेलो होतो आणि तुझी पोस्ट वाचूनही तसंच वाटलं अगदी !! अप्रतिम लिहिलं आहेस. !!

    ReplyDelete
  2. very beutiful!

    गोनीदा नंतर `रोहनदा' झाल्यास आम्हाला आनंदच आहे.
    नवीन पिढीला असाच थोडक्यात समग्र इतिहास सांगणारा रोहनदा' हवाय !!!

    ReplyDelete
  3. रोहणा, उत्तम, अप्रतिम रे मित्रा..सकाळी सकाळी वाचून दिवस सार्थ झाला बघ....

    ReplyDelete
  4. धन्य !!
    वाचताना अंगावर रोमांच उभे राहीले !!
    छान लिहिली आहेस !!

    ReplyDelete
  5. सुंदर रोहन! आभार. हे असे होतो आपण...इतके सच्च्या इमानाचे, शूर, नीडर...मग आता काय झालंय तरी काय आपल्याला? डोकी का फिरलीयत आपली?? परत शिवाजीच यायला हवाय का जन्माला??

    ReplyDelete
  6. अफजल वधाला निघताना छत्रपतिंनी भवानीमातेला केलेली प्रार्थना कविराज भूषण लिहितात :
    जय जयंती, जय आदिशक्ती,
    जय काली कपर्दिनी,
    जय मधुकैटभ छलनी,
    देवी जय महिष:बिमर्दिनी,
    जय चमुंड, जय चंड-मुंड,
    भंडासुर खंडिनी,
    जय सुरक्त, जय रक्तबीज,
    बिड्डाल बिहंडिनी,
    जय निसुंभ-सुंभ:दलनी,
    भनी भूषन जय जय भननी,
    सर्जा समथ्थ शिवराज कहै,
    देही विजय जय जग जननी ॥

    जय भवानी जय शिवराय ॥

    ReplyDelete
  7. अप्रतिम लेख!
    पूर्वीही एक विनंती केली होती: ह्या सुंदर आणि माहितीपूर्ण लेखांचे संकलित असे पुस्तक प्रकाशित करता आले तर उत्तम!

    ReplyDelete
  8. अनुजा..

    माझ्या इतिहास आणि भटकंतीवरच्या लेखांचे इ-पुस्तक लवकरच प्रकाशित करीन. :) त्यावर काम सुरू केले आहे. धन्यवाद. :)

    ReplyDelete
  9. सेनापती..उत्तम लेख आहे....पण मनात एक शंका आली आहे ती म्हणजे जीवा महाले अन सय्यद बंडा याविषयी अफ़जलखान वध म्हणाला की यांचा उल्लेख येतोच...हे अस का???हा पण वादाचा मुद्दा आहे का??

    अफ़जलखान वधावरील एक गीत माझ्या संग्रहीत आहे...ते मी पोस्ट केल होत.कोणी लिहलय हे माहित नाही कदाचित तुम्हाला माहित असेल.

    http://manmaujee.blogspot.com/2010/03/blog-post_3626.html

    ReplyDelete
  10. तू लिहित रहा ...
    आम्ही वाचत राहतो ...

    ReplyDelete
  11. Very Nice article... I have read the same story many time by different writers.. But this is the first one which is along with strategy and which is most important. I went in more depth of the story and I found the gold in it. Thanks for Digging dear friend Rohan.

    ReplyDelete
  12. धन्यवाद योगेश... :)

    ReplyDelete
  13. Excellent, to the point writing showing Chatrapati's greatness, especial his qualities as war strategist.
    Keep on writing.
    Further, I highly appreciate remembering the date of "Shivaji-Afzal" visit and blogging on the date.
    Someone needs to keep track and remind such important dates of Maratha history.

    ReplyDelete
  14. सेनापती, महाराजांच्या आम्ही आपल्या लेखणीतून उतरलेल्या अश्याच एखाद्या महाराजांच्या पराक्रम गाथेची वाट पाहत आहोत. परत एकदा जामुद्या भट्टी.

    ReplyDelete
  15. नक्की... लवकरच लिहीन... :)

    ReplyDelete
  16. अफझल खान वध यात जीव महाले तुमच्या वाचण्यात कसा आला नाही??? "होता जीवा म्हणून वाचला शिवा" ही म्हण उगाच नसेल अस्थित्वात आली!!!कृपया जीवा महाले चा उल्लेख करावा...कारन याकारनाने आपल्याच इतिहासाबाबत संभ्रम निर्माण होत आहे ......कृपया दुरुस्ती करावी ही मागणी ......

    ReplyDelete
  17. दिपक ... तसा योग्य संदर्भ दिल्यास मी बदल करीन... संदर्भ कृपया संदर्भ ग्रंथाचा असावा... कादंबरीमय नको... धन्यवाद.. :)

    ReplyDelete
  18. hello....vry nice blog....keep sharing such good information

    ReplyDelete
  19. "स्थायी यश मिळणार्‍या मोहिमेचा आरंभ म्हणुन अनपेक्षित धक्याला अर्थ असतो पण तो धक्का देऊन थक्क करणे आणि भानावर येण्यापूर्वी स्थिर विजय मिळवणे हा राजकीय वास्तववाद म्हणजे छत्रपती शिवराय... "

    ReplyDelete