Thursday, 30 July 2009
३१ जुलै १६५७
Saturday, 25 July 2009
२५ जुलै १६४८
२५ जुलै १६४८ - विजापूर बादशाहाच्या आज्ञेने मुस्तफाखानाने 'जिंजी'नजीक शहाजी राजांना कैद केले.
पुढे १६ मे १६४९ रोजी विजापुरच्या आदिलशहाकडून शहाजीराजांची सुटका झाली.
शिवरायांनी शहाजीराजांच्या सुटकेसाठी शाहजहानचा मुलगा आणि मुघलांचा दख्खनेचा सुभेदार शहजादा मुराद यास १४ मार्च १६४९ रोजी पत्र लिहिले होते. ह्या पत्राने विजापुरच्या आदिलशहा वर दबाव पडून २ महिन्यानंतर १६ मे १६४९ रोजी शहाजीराजांची सुटका झाली. मात्र त्या बदल्यात शिवरायांना सिंहगड विजापुरला परत द्यावा लागला.
****************************************************************************************
२५ जुलै १६६६ - औरंगजेबाने शिवरायांसोबत आग्रा येथे आलेल्या मराठा फौजेचे परतीचे परवाने शिवरायांकड़े सुपूर्त केले.
दि. ७ जून १६६६ रोजी शिवाजी राजांनी औरंगजेबाकडे मागितलेले परवाने, अखेर आजच्या दिवशी औरंगजेबाने ते परवाने महाराजांना दिले. या परवान्यानूसार शिवाजी राजांना आपल्याबरोबर आलेल्या फौजेला आग्र्याहून रजा देऊन महाराष्ट्रात पाठवता येणार होते.
Thursday, 23 July 2009
२३ जुलै १८५६
Wednesday, 22 July 2009
२२ जुलै १६७८
जिंजी येथील राजकारण यशस्वी करून आणि जिंजी ताब्यात घेउन छत्रपति शिवाजी महाराज वेल्लोर किल्ला जिंकायला स्वतः जातीने दाखील झाले होते. किल्ल्याला वेढा घालून सुद्धा किल्ला सहजा-सहजी हातात येणार नाही आणि ह्यात वेळ बराच जाणार आहे असे समजल्यावर त्यांनी रघुनाथपंत व आनंदराव मकाजी यांच्यावर ही कामगिरी सोपवली. पूर्ण किल्ल्याला चारही बाजूने खोल खंदक असून सुद्धा हा किल्ला मराठ्यान्नी जिंकला.
Monday, 20 July 2009
२० जुलै १७६१
पानीपतच्या युध्हानंतर नानासाहेब पेशवे यांचा मृत्यू झाला. रघुनाथराव यांनी पेशवेपदावर दावा सांगितला पण माधवराव यांनाच पेशवेपद मिळाले.
खचलेल्या मराठा साम्राज्याला नवी उभारी देण्यास वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी पेशवे माधवराव सज्ज झाले होते.
Wednesday, 15 July 2009
१५ जुलै १६७४
१६७४ मध्ये राजाभिषेकानंतर पुन्हा एकदा मराठ्यान्नी मुघल भागात छापे मारून लुट मिळवणे सुरु केले. पेडगावमध्ये मोठ्या प्रमाणात मुघल फौज होती मात्र मराठ्यान्नी त्यांना मुर्ख बनवून लुट मिळवली. काही हजारांचे सैन्य आधी पेड़गाववर चालून गेले आणि जेंव्हा मुघल फौज समोर उभी ठाकली तेंव्हा मात्र मागे फिरून पळू लागले. मुघल फौजेला वाटले मराठे घाबरुन मागे पळत आहेत. मात्र डाव वेगळाच होता. ज्याक्षणी मुघल फौज मराठा सैन्याचा पाठलाग करत-करत पेड्गावच्या हद्दीपासून दूर गेली त्याक्षणी दुरवर लपून बसलेल्या इतर मराठा फौजेने पेड़गावमध्ये प्रवेश केला आणि संपूर्ण पेड़गाव लुटले. अर्थात मुघल फौजेला जेंव्हा जे समजले त्यावेळी ते मागे फिरले मात्र मराठा सैन्याने तोपर्यंत आपले काम चोख केले होते. ह्यालुटीने राजाभिषेकाचा बराचसा खर्च शिवरायांनी भरून काढला.
Sunday, 12 July 2009
१२ जुलै १९०८
१२ जुलै १९०८ - लोकमान्य टिळकांना मंडालेची सहा वर्षांची शिक्षा झाली, या घटनेला १२ जुलै रोजी १०० वर्षे पूर्ण.
यावेळी मुंबईच्या जनतेने सहा दिवस प्रक्षुब्ध होऊन हरताळ पाळला. मुंबई हायकोर्टात दोन आठवडे चाललेल्या लोकमान्य टिळकांवरील राजद्रोहाच्या खटल्याचा निकाल त्यादिवशी रात्री दहा वाजता न्या. दावरनी देऊन लोकमान्यांना सहा वर्षे कारावास आणि एक हजार रुपये दंडाची जबर शिक्षा ठोठावली.
Friday, 10 July 2009
११ जुलै १६५९

Wednesday, 8 July 2009
८ जुलै १९१०
संदर्भ ... डॉ. सच्चिदानन्द शेवडे .. लोकसत्ता विशेष ... !!!
स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांनी मार्सेल्सच्या समुद्रात उडी घेतली, त्या घटनेस ८ जुलै २००९ रोजी ९९ वर्षे पूर्ण होत आहेत. समस्त भारतीयांना अभियान वाटावा असे इतिहासातील हे सोनेरी पान.
१ जुलै १९१० ला त्यांना ‘मोरिया’ बोटीवर चढविण्यात आले. ती ७ जुलैला मार्सेल्सला आली. शौचकुपातल्या पोर्टहोलचे माप त्यांनी जानव्याने घेतले. खिडकीचा व्यास १२ इंच होता. सावरकरांच्या छातीचा घेर ३२ इंच होता. सर्व पाहाणी करून झाल्यावर ८ जुलैच्या सकाळी त्यांनी शौचाला जाण्याचा बहाणा केला. आत जाताच अंगातला गाऊन काढून काचेच्या दारावर पसरून अडकवला. एका झेपेत कमोडवरील पोर्टहोल गाठले. कसेबसे शरीर त्यातून बाहेर काढले. त्याचवेळी संडासाचे दार फोडून शिपाई आत घुसले. सोलवटल्या शरीराने सागरात उडी घेतली. गँगवेवर उभ्या असलेल्या क्वार्टर मास्टरने हे दृष्य पाहून आरडाओरडा केला. अटकेतून सुटका करून घेण्यासाठी अपरिचित समुद्रात उडी घेणे हे लोकविलक्षण साहस होते. समोरचा धक्का हा नऊ फूट उंच होता. त्यावरील शेवाळामुळे ते एक दोनदा पाण्यात पडले. तरीही नेटाने तो धक्का चढून गेले. तेथे कोणी सहकारी दिसत नाहीत हे पाहून ते धावू लागले. काही अंतरावर एक फ्रेंच पोलीस त्यांना दिसला. त्याला ते म्हणाले, Take me into your Custody. Assist me. Take me before a magistrate! त्याला इंग्रजी येत नव्हते नि त्यांना फ्रेंच येत नव्हते. तोवर तेथे येऊन पोचलेल्या शिपायांनी त्या पोलिसाची मूठ गरम केली आणि सावरकरांना ताब्यात घेतले.
हे प्रकरण दाबायचा प्रयत्न इंग्रजांनी केला, पण कामाबाईंमुळे ‘ल ताँ’ या फ्रेंच वृत्तपत्रात ९ जुलै आणि डेली मेलच्या ११ जुलैच्या अंकात हे वृत्त प्रसिद्ध झाले. आता सावरकरांसाठी ‘इनर केबिन’ निवडण्यात आली. चोवीस तास लक्ष ठेवण्यात येऊ लागले. डेकवर हिंडताना दोन रक्षक त्यांचे हात पकडून फिरत असत. केबिनमधील दिवे चालू असत. त्यांच्या तोंडावर प्रकाश पडेल अशी योजना करण्यात आली. त्यामुळे स्वस्थ झोप घेणे दुरापास्त झाले. या स्थितीतही त्यांना काव्य सुचले..
अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला।
जिंकिल रिपु कवण असा जगति जन्मला।।
यानंतर मोरिया बोट एडनला आली. तिथे सशस्त्र शिपायांच्या गराडय़ात सावरकरांना उतरविण्यात आले व सालसेट नामक बाष्पनौकेवर चढविण्यात आले. २२ जुलैला ही नौका कडेकोट बंदोबस्तात मुंबईला पोचली. आचार्य अत्रे त्यावेळचे वर्णन करताना म्हणतात, ‘ज्यावेळी आमचा हा पुरुषसिंह इंग्रज सरकारने तुरुंगात नेऊन कोंबला, तेव्हा त्याचा आवेश आणि डरकाळ्या ऐकून मी मी म्हणणाऱ्या अधिकाऱ्यांच्या छातीत धडकी भरत असे.’ वृत्तपत्रातल्या बातम्यांमुळे फ्रान्स सरकारवर दडपण आले. सरकारने आंतरराष्ट्रीय निर्बंधांनुसार हक्काचा प्रश्न काढला. यावर उत्तर देण्यासाठी इंग्रज राजधुरिणांची तारांबळ उडाली. डेली मेलसारख्या ब्रिटिश वृत्तपत्रांनी देखील सरकारला धारेवर धरले. बॅ. बॅप्टिस्टा हे सावरकरांचे वकील होते. त्यांनी सावरकरांबरोबर चर्चा करून मार्सेल्सचा वृत्तान्त नीट लिहून काढला व पॅरिसमधील मित्रांकडे धाडला. ल ह्यूमनाईट व ल ताँ या वृत्तपत्रांनी या आधारे लेख लिहिले. डेली न्यूजने लंडनमधे तेच केले. या सर्वांना उत्तर देणे इंग्रज सरकारला कठीण झाले.
अखेर हेग येथील आंतरराष्ट्रीय निवाडा न्यायमंडळापुढे हे प्रकरण जावे, असे फ्रेंच सरकारने सुचवले. ब्रिटनने ते मान्य केले, पण त्या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत अभियोग स्थगित ठेवण्याची मागणी मात्र फेटाळली. सावरकरांना फ्रेंच सरकारच्या स्वाधीन करायला हवे की नको, एवढय़ासाठीच हा सर्व घोळ घालण्यात आला. हा निवाडा होण्यापूर्वी ३० जानेवारी १९११ ला सावरकरांना दोन जन्मठेपांची शिक्षा झाली.
हेग येथील सुनावणी 'In Camera' झाली व त्यांनी इंग्लंडची बाजू योग्य ठरवली. यामुळे टीकेचे मोहोळ उठले व फ्रेंच पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला. एकूण या एका कृतीमुळे सावरकरांनी संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले एवढे खरे!
Tuesday, 7 July 2009
आषाढ शुद्ध पौर्णिमा उर्फ़ गुरूपौर्णिमा ...


सरणार कधी रण प्रभू तरी हे ... कुठवर सहु घाव शिरी ... ! धृ
दिसू लागले अभ्र सभोवती ... विदिर्ण झाली जरीही छाती ... !
अजून जळते आंतरज्योती ... अजून जळते आंतरज्योती ... कसा सावरू देह परी ... !
सरणार कधी रण प्रभू तरी हे ... कुठवर सहु घाव शिरी ... सरणार कधी रण ... ! १
मिटण्या झाले अधीर लोचन ... मिटण्या झाले अधीर लोचन ... खड्ग गळाले भूमिवरी ... !
सरणार कधी रण प्रभू तरी हे ... कुठवर सहु घाव शिरी ... सरणार कधी रण ... ! २
पावनखिंडित पाउल रोवून ... शरीर पिंजे तो केले रण ... !
शरणागतीचा अखेर येई क्षण ... शरणागतीचा अखेर येई क्षण ... बोलवशील का आता घरी ... !
सरणार कधी रण प्रभू तरी हे ... कुठवर सहु घाव शिरी ... सरणार कधी रण ... ! ३
"इतिहास हा केवळ सांगण्यातून किंवा ऐकण्यातून कळत नसतो तर तो अनुभवायला देखील लागतो."
पावनखिंडितला हा अनुभव असाच एक अविस्मरणीय असा आयुष्यावर कायमचा कोरला गेलेला.
Monday, 6 July 2009
६ जुलै १७३५
Saturday, 4 July 2009
४ जुलै १७२९
४ जुलै १७२९ - सरखेल कान्होजी आंग्रे स्मरणदिन. समाधी स्थळ - ठुकराली नका, अलिबाग.
तुकोजी संकपाळ व बिम्बाबाई चा हा मुलगा राजगुरुनगर येथे जन्मला. नवसाने आणि अंगाऱ्या धूपाऱ्याने जन्मला म्हणुन आडनाव आंग्रे लाविले. त्यांनी ३ लग्ने केली. पाहिली पत्नी राजूबाई / मथुराबाई कडून त्यांना सेखोजी आणि संभाजी उर्फ़ आबासाहेब अशी २ मुले झाली. सेखोजी हे नाव त्यांच्या आजोबांच्या नाव वरुन ठेवले गेले. दूसरी पत्नी राधाबाई / लक्ष्मीबाई कडून त्यांना मानाजी आणि तुळाजी असे २ पुत्र झाले. तर तिसरी पत्नी गहिणबाई कडून त्यांना येसाजी व धोंडजी असे २ पुत्र झाले. या शिवाय शेवटी एक मुलगी झाल्याने तिचे नाव 'लाडूबाई' ठेवले गेले.
छत्रपति शिवाजी महाराजांच्या काळात कान्होजी सुवर्णदुर्ग येथे चाकरीला होते. १६८८ मध्ये सुवर्णदुर्गचा किल्लेदार अचलोजी मोहिते पैसे घेउन फितुरीने किल्ला सिद्दीकड़े सोपवणार असे कळल्यावर कान्होजी यांनी सिद्दीविरुद्ध किल्ला लढवला आणि पराक्रम केला. पुढे १६९८ मध्ये सरखेल सिधोजी गुजर गेल्यानंतर राजाराम महाराजांनी कान्होजी अंग्रे यांना सरखेल (आरमाराचा सरसेनापती) पद सोपवले. ते त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांसकडेच होते. मराठा - मुघल युद्धामध्ये कोकणपट्टी सांभाळण्याचे कार्य कान्होजी आंग्रे यांनी पार पाडले. पोर्तुगीज, इंग्रज आणि सिद्दी यांना त्यांनी चांगलेच जेरिस आणले आणि संपूर्ण भागात आपला वचक प्रस्थापित केला.
१७०७ मध्ये मराठेशाही मध्ये फुट पडल्यावर मात्र त्यांनी कोणाचीही बाजु न घेता स्वतंत्रपणे कारभार सुरु केला. मात्र पुढे त्यांचे बालमित्र असलेले बाळाजी विश्वनाथ पेशवे यांनी त्यांचे मन वळवून सातारा गादी बरोबर वळवंड, लोणावळा येथे तह करवला.
सरखेल कान्होजी आंग्रे यांची मुद्रा - "शाहूकार्ये धुरंदर तुकोजी तनुजनमानहा कान्होजी सरखेलस्य
मुद्री येकम विराजते"
पुढे त्यांनी अलीबाग हे आपले मुख्य ठाणे बनवले जेथे आजही त्यांचे वंशज राहतात. ४ जुलै १७२९ रोजी ह्या विराला मरण आले. परकियांची सत्ता या भूमीत रोवु न देण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी पार पाडले. त्यांना लक्ष्य लक्ष्य प्रणाम ...