Tuesday, 7 July 2009

आषाढ शुद्ध पौर्णिमा उर्फ़ गुरूपौर्णिमा ...


दिवस होता गुरूपौर्णिमेचा ... १२ जुलै १६६० ... पावनखिंड - बाजीप्रभूंच्या रक्ताने पावन झालेली. जेथे बाजीप्रभूंनी देह ठेवला. जेथे त्यांनी मृत्यूला सुद्धा ओशाळवले.

आषाढ शुद्ध पौर्णिमा उर्फ़ गुरूपौर्णिमेच्या आदल्या दिवशी शिवरायांनी पन्हाळ्यावरुन अद्भुतरित्या स्वतःची सुटका करून घेतली होती. तर गुरूपौर्णिमेच्या दिवशी घोड़खिंड बाजीप्रभुंच्या रक्ताने पावनखिंड बनली. अवघ्या २१ तासात ६४ किलोमीटर अंतर त्यांनी पार पाडले होते. पौर्णिमेची रात्र. चंद्रप्रकाश असूनसुद्धा पावसाळी ढगांमुळे फारसे काही दिसत नव्हते. प्रचंड पावसाचा फायदा घेत शिवराय पन्हाळ्यावरुन निसटले. सिद्दीजोहरला त्याचा पत्ता लागला. पालखी पकडली गेली.



'शिवाजी आपल्या ताब्यात आला आहे' अश्या खुशीत असलेल्या जोहरच्या भ्रमाचा भोपळा लगेच फुटला. त्याला कळून चुकले की हे राजे नसून शिवा काशिद नावाचा दुसराच कोणी तरी आहे. राजे आपल्या हातून निसटले आहेत. त्याने सिद्दी मसूद आणि फाझल खानाला शिवरायांच्या मागावर पाठवले. पाठलाग सुरु झाला ... शिवाजी राजे पालखीचा गोंडा पकडून बसले होते. बाजींचा आवाज त्यांच्या कानावर येत होता. 'चला गनीम पाठीवर आहे.' दर काही मिनिटांना पालखीचे भोई बदलत, वारा - पावसाची तमा न बाळगता, काटेरी रान आणि दगड - चिखल - माती तुडवत ते ६०० वीर विजेच्या वेगाने पळत सुटले होते. उदिष्ट एकच होत - विशाळगड़. हातात नंग्या तलवारी घेउन बाजी - फुलाजी पालखीच्या बाजूने धावत होते. मागचे आणि पुढचे हेर बित्तंबातमी राजांकड़े पोचवत होते. प्रचंड वेगाने पालखी घोड़खिंडीकड़े पळवली जात होती. क्षण अन क्षण आता महत्त्वाचा होता.



सिद्दीमसूदचे सैन्य घोड्यावरुन राजांचा पाठलाग करत होते. त्यांनी थोडा वेगळा मार्ग घेतला होता. अर्थात घोड़खिंडीच्या अलिकड़े राजांना गाठायचे असे त्यांनी पक्के केले असेल. त्यांच्या थोड़े मागून आदिलशहाच्या पिडनायकाचे पायदळ येत होते. राजांचे पहिले लक्ष्य होते पांढरपाणी. एकदा तिकडे पोचले की खिंड गाठणे अवघड जाणार नव्हते. आदल्या दिवशी रात्री १० वाजता पन्हाळगड सोडल्या पासून १२ तासात कोणी थोडया विश्रांतीसाठी सुद्धा थांबले नव्हते. एका ध्येयाने भारावल्यागत ते ६०० वीर विशाळगडाकड़े पळत सुटले होते.



पन्हाळगड ते पावनखिंड एकुण अंतर आहे ६१ किलोमीटर. तर पन्हाळगड पासून ५५ किलोमीटर अंतरावर आणि पावनखिंडिच्या ६ किलोमीटर अलिकड़े पांढरपाणी आहे. पांढरपाणीच ऐतिहासिक महत्व अनन्य साधारण आहे. महाराज पांढरपाणीला येउन पोचलो होते त्यावेळेला घोड्यावरुन राजांचा पाठलाग करणारे सिद्दीमसूदचे सैन्य अगदी जवळ येउन ठेपले होते. धोका वाढत जात होता. कुठल्याही क्षणी त्यांची धाड पडेल असे वाटू लागले. शत्रुला गुंतवायला राजांनी २५ मावळे पांढरपाणीला ठेवले आणि ते घोड़खिंडीकड़े निघाले. अवघे २५ जण आता त्या २००० घोडेस्वारांशी लढायला तयार झाले होते. जास्तीत जास्त वेळ शत्रुला रोखून धरायचे काम त्यांना बजावावे लागणार होते. तितका बहुमूल्य वेळ राजांना खिंडीकड़े सरकायला मिळणार होता. आलेल्या घोडदळाला त्या २५ मावळ्यांनी शर्थीने रोखून धरले. त्यात त्या सगळ्या २५ जणांना मृत्यू आला. पण आपले काम त्यांनी चोख बजावले होते. पांढरपाण्याची नदी रक्ताने लाल झाली होती. राजे घोडखिंडीकड़े जाउन पोचले होते.

"पावनखिंड - बाजीप्रभूंच्या रक्ताने पावन झालेली. जेथे बाजीप्रभूंनी देह ठेवला. जेथे त्यांनी मृत्यूला सुद्धा ओशाळवले. "

राजांनी रायाजी बांदलाला ३०० मावळे सोबत घेऊन खिंडीमध्ये शत्रूला रोखायचे काम दिले. पण आपल्या मालकाऐवजी म्हणजेच रायाजीऐवजी मी ह्या ठिकाणी थांबतो, तुम्ही रायाजीला सोबत घेऊन विशाळगड गाठा, असे बाजींनी राजांना सुचवले. बाजींची स्वामीभक्ती येथे दिसून येते. आता राजे उरलेले मावळे सोबत घेऊन विशाळगडाकड़े निघाले. बाजींनी खिंडीमध्ये आपली व्युव्हरचना केली. चढणीवरच्या आणि आसपासच्या झाडीमध्ये गटागटाने मावळे तैनात केले. प्रत्येकाकडे गोफणीतून भिरकवायचे दगड आणि ढकलायचे शिलाखंड जमा केले गेले. शत्रु टप्यात येण्याची वाट बघत सगळे दडून बसले होते. १२-१३ तासांच्या अथक वाटचाली नंतर सुद्धा निवांतपणा नव्हता. निर्णायक लढाईसाठी आता ते ३०० वीर सज्ज झाले होते. पूर्वेच्या दिशेने घोड्यांच्या टापांचे आवाज ऐकू येऊ लागले. थोड्यावेळात शत्रु नजरेत येऊ लागला पण शत्रुच्या नजरेत लपलेले मावळे काही येत नव्हते. त्या अवघड निसरड्या वाटेने एक रांग धरून सिद्दीमसूदचे घोडेस्वार उतरु लागले. गोफणीच्या टप्यात शत्रू आल्यावर बाजींनी एकच हाकाटी दिली आणि अचानक शत्रूच्या अंगावर दगड बरसू लागले. घोड्यांनी कच खाल्ली. काही उधळले. काही सरकून पडले. एकच गोंधळ उडाला. कित्येकांची डोकी फुटली, बाकी जिवाच्या भीतीने मागे पळाले. मावळ्यांनी हर हर महादेवचा नारा दिला. पण शत्रू इतक्यात मागे सरकणार नव्हता. घोडेस्वार पुन्हा उतरु लागले. मावळ्यांनी पुन्हा दगड भिरकवायला सुरवात केली. ते शत्रूला काही केल्या पुढे सरकू देईनात. साधारण ४ वाजत आले होते. थोड़े मागून येणाऱ्या आदिलशहाच्या पिडनायकाचे पायदळ आता खिंडीकड़े येउन पोचले. ते अधिक वेगाने ओढ़यापलिकडे सरकू लागले. आता मावळ्यांनी त्यांच्यावर शिलाखंड ढकलायला सुरवात केली. त्यामुळे पायदळाची पांगापांग होऊ लागली. अखेर तासाभरानी शत्रूला वर पोहोचण्यात यश मिळाले.

आता आजूबाजुच्या झाडीमधून बाजीप्रभू आणि इतर मावळे बाहेर पडले आणि प्रत्यक्ष रणमैदानात शस्त्राची लढाई सुरु झाली. एक-एक मावळा त्वेषाने लढत होता. दहा-दहा जणांना पुरून उरत होता. बाजींच्या तलवारीच्या टप्यात येणारा प्रत्येकजण यमसदनी जात होता. स्वतःच्या देहाची जणू काही त्यांनी तटबंदी करून घेतली होती. बाजींचे थोरले बंधू फुलाजीप्रभू सुद्धा तितक्याच त्वेषाने लढत होते. इतक्यात शत्रूने फुलाजीप्रभुंवर डाव साधला. ते खाली कोसळले. त्यांच्या हातून खड्ग गळाले. बाजींनी एक नजर त्यांच्याकड़े पाहिले. ते म्हणाले, "दादा, तुम्ही थोरले. पहिला मान तुम्ही घेतला." फुलाजीप्रभुंची तलवार त्यांनी उचलली. आधी एक ढाल - एक तलवार घेउन लढणाऱ्या बाजींनी आता दोन्ही हातात तलवारी घेतल्या होत्या. त्यांचा आवेश पाहून शत्रूचे धाबे दणाणले होते. बाजी आता अधिक त्वेषाने लढत होते. त्यांच्या देहाची आता चाळण उडाली होती. रक्ताचे अर्ह्य ओसंडत होते. हे काही आपली वाट सोडत नाहीत असे पाहून पिडनायकाने आपल्या एका पायदळ सैनिकाला ठासणीच्या बंदूकीतून बाजींवर गोळी झाडायला सांगितली. ती गोळी बाजींच्या खांद्यात घुसली. बाजींचा शस्त्राचा एक हात थांबला. लढता-लढता ते खाली कोसळले. पण त्यांचे प्राण काही जात नव्हते. त्यांचे कान विशाळगडाकड़े लागले होते. राजे जोपर्यंत गडावर पोचून तोफांचे बार देत नाहीत तोपर्यंत त्यांनी मृत्युला ठणकावून सांगितले " तोफे आधी न मरे बाजी. " बाजींच्या मनाची घालमेल होत होती. त्यांच्या मनात अखेरचे विचार सुरु होते.

सरणार कधी रण प्रभू तरी हे ... कुठवर सहु घाव शिरी ... !
सरणार कधी रण प्रभू तरी हे ... कुठवर सहु घाव शिरी ... ! धृ


दिसू लागले अभ्र सभोवती ... विदिर्ण झाली जरीही छाती ... !
अजून जळते आंतरज्योती ... अजून जळते आंतरज्योती ... कसा सावरू देह परी ... !
सरणार कधी रण प्रभू तरी हे ... कुठवर सहु घाव शिरी ... सरणार कधी रण ... ! १
होय तनूची केवळ चाळण ... प्राण उडाया बघती त्यातून ... !
मिटण्या झाले अधीर लोचन ... मिटण्या झाले अधीर लोचन ... खड्ग गळाले भूमिवरी ... !
सरणार कधी रण प्रभू तरी हे ... कुठवर सहु घाव शिरी ... सरणार कधी रण ... !



पावनखिंडित पाउल रोवून ... शरीर पिंजे तो केले रण ... !
शरणागतीचा अखेर येई क्षण ... शरणागतीचा अखेर येई क्षण ... बोलवशील का आता घरी ... !
सरणार कधी रण प्रभू तरी हे ... कुठवर सहु घाव शिरी ... सरणार कधी रण ... ! ३

तिकडे विशाळगडाच्या वाटेवर राजांच्या मनाची घालमेल होत होती. रणगर्जनेचे आवाज त्यांच्या कानावर पडले होते. पण त्यांना पुढे सरकणे भाग होते. विशाळगडाला वेढा घालून बसलेल्या सुर्वे आणि दळवी या आदिलशहाच्या वतनदारांच्या सैन्याला कापत सतत २१ तासांच्या वाटचालीनंतर राजांनी विशाळगड गाठला आणि गडाच्या किल्लेदाराला त्वरेने तोफांचे बार देण्याची आज्ञा केली. ते बार घोड़खिंडीमध्ये ऐकू गेले. त्यानंतरच समाधानाने बाजींनी आपला देह सोडला.


"इतिहास हा केवळ सांगण्यातून किंवा ऐकण्यातून कळत नसतो तर तो अनुभवायला देखील लागतो."
पावनखिंडितला हा अनुभव असाच एक अविस्मरणीय असा आयुष्यावर कायमचा कोरला गेलेला.

10 comments:

  1. आज हा अध्याय वाचून माझी गुरुपौर्णिमा खऱ्या अर्थाने पावन झाली... धन्यवाद..

    ReplyDelete
  2. पौर्णिमा ही नेहमी शुद्धच असते... वद्य किंवा कृष्ण पक्षात अमावस्या येते.. त्यामुळे ही फक्त आषाढ (गुरु) पौर्णिमा म्हणणेच यथार्थ वाटते. असो... आपला हा उपक्रम खरोखरच अप्रतिम आहे.

    ReplyDelete
  3. apratim lihilay.. !!

    dhanya to kaal dhanya ti manasa.. !!

    ReplyDelete
  4. रोहणा, रडवलंस रे.. अक्षरशः रडलो आत्ता ऑफिसमध्ये. काटा आला अंगावर. वाचवत नव्हतं. धन्य ते बाजीप्रभू !!!

    ReplyDelete
  5. रोहन दादा अरे काही सुचतच नाही. जबरदस्त प्रसंग असेल नाही

    ReplyDelete
  6. रणचंडीचे खरे पुजारी
    बाजी आणि फुलाजी

    ReplyDelete
  7. atishay sundar likhan, angavar shahare aale, kharach itihas ha vachun kiva lihun kalat nahi tar to swata ghadvava lagto

    ReplyDelete
  8. Baji tumhala amcha manacha Mujara

    ReplyDelete
  9. खूप छान लिहिले आहे, इतिहास हा केवळ सांगण्यातून किंवा ऐकण्यातून कळत नसतो, तर तो अनुभवायला लागतो..!!

    ReplyDelete
  10. लहानपणापासून माझी एक शंका आहे....
    शिवाजी महाराज पालखीत बसून का जात होते ?
    घोडदळ वापरून आणि स्वतः घोड्यावरून विशाळगडला का नाही गेले ?

    ReplyDelete